ITI Admission Registration
सुनील कच्छवे
छत्रपती संभाजीनगर यंदा मराठवाड्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रवेश नोंदणीला ओहोटी लागली आहे. गतवर्षी विभागातील आठ जिल्ह्यातील तब्बल ५० हजार १८ विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. यंदा ही नोंदणी तब्बल पंधरा हजारांनी घटली आहे. विभागात यंदा एकूण ३५ हजार ५६१ विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन नोंदणी केली आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने राज्यभरात शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या ३७ व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. इयत्ता दहावीनंतर अल्प कालावधीत व्यवसाय कौशल्य प्राप्त करुन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्यादृष्टीने आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असतो.
त्यामुळे दरवर्षी प्रत्यक्ष प्रवेश क्षमतेच्या दोन ते अडीच पट विद्यार्थ्यांची नोंदणी होत असते. मात्र, यंदा हे चित्र काहीसे बदलले आहे. १५ मेपासून आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत सुरूवातीला विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी आणि त्यानंतर प्रवेश अर्ज निश्चितीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर २६ मेपासून पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय (ट्रेड) व संस्थांनिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्याची प्रक्रिया पार पडली.
मात्र, यंदा गतवर्षीपेक्षा खूपच कमी नोंदणी झाल्याचे आता दिसून येत आहे. प्राप्त आकडेव ारीनुसार, गतवर्षी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील एकूण १४९ आयटीआयमधील प्रवेशांसाठी ५० हजार १८ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली होती. गुणवत्ता यादीनुसार यातील २१ हजार ९४४ जागांवर प्रवेश देण्यात आले होते.
परंतु यंदा ३५ हजार ५६१ विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी शासकीय आयटीआयमध्ये विजतंत्री (इलेक्ट्रीशीन), जोडारी (फिटर), मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स, यांत्रिक मोटार गाडी, लघुलेखन इंग्रजी, सर्वेक्षण या सारख्या विषयांच्या प्रशिक्षणाला विद्यार्थी प्राधान्य देत असल्याचे सांगण्यात आले.
66 आयटीआय प्रवेशासाठी दरवर्षी खूप मोठ्या संख्येने अर्ज येतात. त्या तुलनेत यंदा थोडे कमी अर्ज आले आहेत. त्याचे कारण समजू शकलेले नाही. परंतु शेवटची तारीख २५ आहे, त्यामुळे आणखी काही अर्ज येतील, अशी अपेक्षा आहे.- दिलीप वानखेडे, उपप्राचार्य, देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था.