Sambhajinagar news : कडा कार्यालयाच्या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करा file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar news : कडा कार्यालयाच्या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करा

एमआयएम नगरसेवकाची मुख्य सचिवांकडे तक्रार

पुढारी वृत्तसेवा

Investigate the land purchase transaction of the Kada office

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गारखेडा येथील गजानन महाराज मंदिराजवळील कडा कार्यालयाची ५३३ चौरस मीटर जमीन महापालिकेने २ कोटी ७१ लाख ८३ हजार रुपये मोजून खरेदी केल्याचा व्यवहार वादात आला आहे. या प्रकरणावर दैनिक पुढारीने वृत्त प्रकाशित केल्यानंतर एमआयएमचे प्रभाग १३ (ड) चे नगरसेवक सय्यद उसामा अब्दुल कादीर यांनी मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. महसूल विभागाची पूर्वपरवानगी न घेता व्यवहार केल्याचा आरोप करीत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.

नगरसेवक उसामा यांच्या तक्रारीनुसार, ही जमीन महसूल विभागाने १९७४ मध्ये शासकीय वापरासाठी जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित केली होती. १ जून २०१७ च्या शासन निर्णयानुसार अशा जमिनीबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ राज्य सरकारला आहे. मात्र जिल्हाधिकारी किंवा महसूल विभागाची पूर्वपरवानगी न घेता ऑक्टोबर २०२५ मध्ये महापालिकेने २ कोटी ७१ लाख ८३ हजार रुपये अदा केले. रक्कम भरून आठ महिन्यांहून अधिक काळ उलटूनही जमीन महापालिकेकडे हस्तांतरित झालेली नाही.

अर्टीच्या उल्लंघनाबाबतचा पत्रव्यवहार जिल्हाधिकारी आणि शासनस्तरावर प्रलंबित असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सारंग हाउसिंग सोसायटी तसेच गजानन महाराज चौक ते पुंडलिकनगरदरम्यान १५ मीटर रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी ही जमीन खरेदी केल्याचे सांगितले जाते.

रस्त्याचा फायदा बिल्डरच्या प्रकल्पाला होणार असल्याचा आरोप नगरसेवक उसामा यांनी केला आहे. दरम्यान, आर्थिक चणचण असल्याचे सांगणाऱ्या महापालिकेने खासगी -प्रकल्पासाठी मोठी रक्कम खर्च करण्याची घाई का केली, असा सवालही निवेदनात उपस्थित केला.

या व्यवहाराची चौकशी करून अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, दोषींवर कारवाई करावी आणि चौकशीपर्यंत पुढील कार्यवाही थांबवावी, अशी मागणीही केली आहे. परवानगी न मिळाल्यास व्यवहार रद्द करून रक्कम वसूल करावी. यासह फायली व मंजुऱ्या सार्वजनिक कराव्यात, असेही निवेदनात म्हटले आहे.

परवानगीचा पेच

१९७४ मध्ये महसूल विभागाने जमीन जलसंपदा विभागाकडे दिली. २०१७ च्या शासन निर्णयानुसार याबाबतचा अधिकार राज्य सरकारला असल्याचा दावा आहे. तरीही महापालिकेने रक्कम अदा केली.

चार प्रमुख मागण्या

चौकशी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई, पुढील कार्यवाहीला स्थगिती, परवानगी न मिळाल्यास व्यवहार रद्द करून रक्कम वसुली आणि फायली व मंजुऱ्या सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT