छत्रपती संभाजीनगर : इन्स्टाग््राामवरून ओळख वाढवून एका 35 वर्षीय विवाहितेवर अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग करणारा जलसंपदा विभागाचा उपविभागीय अभियंता वैभव विजय पाटील हा गुन्हा दाखल होऊन दहा दिवस लोटले तरी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आरोपी एका उच्चभ्रू आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील असल्याने त्याला वाचवण्यासाठी पोलिसांवर वरून काही दबाव तर येत नाही ना? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
सिटी चौक पोलिस ठाण्यात 27 एप्रिल रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी वैभव पाटील याने शहरातून पोबारा केला आहे. तो ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प, विभागीय पथक क्र. 4, आखाडा बाळापूर येथे उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत आहे. कर्तव्यावर दांडी मारून शहरात हे संतापजनक प्रताप करणारा हा अधिकारी अद्याप पोलिसांना का सापडत नाही, यावर आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव पाटील याची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत उच्चभ्रू आणि राजकीय वजनाची आहे. त्याची आई नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
तर, त्याचे वडील याच जलसंपदा विभागात उपविभागीय अभियंता पदावरून निवृत्त झालेले आहेत. घरातच प्रशासकीय आणि राजकीय ताकद असल्याने या प्रकरणातील तपासाची चक्रे जाणीवपूर्वक संथगतीने तर फिरवली जात नाहीत ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.