महापौर-उपमहापौर पदावरून भाजपात धुसफूस Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

महापौर-उपमहापौर पदावरून भाजपात धुसफूस

प्रदेशाध्यक्ष चव्हाण आज शहरात, स्थानिक कोअर कमिटीची होणार बैठक

पुढारी वृत्तसेवा

Infighting within the BJP over the mayor and deputy mayor positions

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उमेदवार निश्चित करताना नेते अडचणीत आले असून, अंतर्गत धूसफूस सुरू झाल्याने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आज (दि.३) भाजपच्या विभागीय कार्यालयात स्थानिक नेत्यांची बैठक होणार आहे. त्यात महापौरपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा करून गटनेता निश्चित केला जाणार आहे, तर महापौरपदाचा उमेदवार हा मुख्यमंत्रीच निश्चित करणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल ३८ वर्षांनंतर भाजपने चमत्कार केला आहे. ११५ जागांपैकी तब्बल ५७ जागांवर यश मिळल्याने केवळ एका जागेने भाजप स्पष्ट बहुमत हुकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकीची जबाबदारी ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांच्यावर सोपविली होती. त्यानुसार मंत्री सावे यांनी खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांना एकजूट करून प्रच ारवर भर दिला. त्यामुळे पक्षाला घवघवीत यश मिळाले. परंतु, आता महापौर पदावरून पक्षात पुन्हा एकदा अंतर्गत धूसफूस वाढली आहे. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने प्रत्येक नेता आता आपापल्या उमेदवारासाठी जोर लावत आहे.

मंत्री सावे यांनी सर्व इच्छुकांची नावे जशास तशी प्रदेशाध्यक्षकांकडे पाठविण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यावरूनही इच्छुकांमध्ये वादंग सुरू झाले आहेत. भाजपचे निवडणूक प्रभारी तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावर स्थानिकांशी चर्चा केली.

त्यानुसार आज मुंबईत महापौरपदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी शक्यता होती. परंतु स्थानिकांमध्येच चढाओढ सुरू झाल्याने ही बैठक रद्द करून प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनाच आज शहरात पाठविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार आणि महापौर पदाचे उमेदवार यासह गटनेता पदाच्या उमेदवारांसह चर्चा करून निश्चित केला जाणार आहे. महापौर पदाचा उमेदवार हा मुंबईतच ठरणार आहे.

खुल्या प्रवर्गामुळे अडचण

दरम्यान, महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उमेदवार निवडताना नेत्यांमध्ये हेवेदावे सुरू झाले आहेत. या वादातून मार्ग काढण्यासाठी खुल्याऐवजी इतर प्रवर्गाचा उमेदवार द्यायचा का, यावरही पक्षात खल सुरू असल्याची चर्चा आहे.

सर्वच पदे भापजकडे

भाजप शिवसेनेसोबत युतीत सत्ता स्थापन करणार आहे. त्यामुळे सर्व पद भाजपकडे राहणार असले तरी ठाणे, कल्याण-डोंबिवलीप्रमाणे भाजप शिंदे सेनेला उपमहापौरपद देण्याबाबत विचार करीत आहे. तसे संकेत रविवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही दिले आहेत. महापौर पदावरून सध्या वाद सुरू आहेत. परंतु स्थायी समिती सभापती पदही भाजपकडेच राहणार असल्याने नाराजांना सभापती पद दिले जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT