IndiGo flight lands safely at airport
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
आकाश काळ्याकुट्ट ढगांनी व्यापलेले तसेच ताशी ९० किलोमीटर वेगाने वाहणारी हवा याच दरम्यान चिकलठाणा विमानतळावर इंडिगो विमानांची उतरण्याची वेळ, अशा प्रतिकुल परस्थितीत इंडिगोच्या विमानाने गुरुवारी (दि.१२) सायंकाळी चिकलठाणा विमानतळावर सुरक्षितपणे लँडिंग केले.
ढगांच्या गर्दीतून मार्ग काढताना वैमानिकाला बरेच परिश्रम घ्यावे लागले. अशाच प्रतिकुल परिस्थितीमुळे बुधवारी (दि.११) इंडिगोच्या विमानाला चिकलठाणा विमानतळावर उतरता आले नव्हते.
गुरुवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास बुधवार सारखाच सोसाट्याचा वारा, ढगांच्या गर्दीने आकाश व्यापलेले होते. सोसाट्याच्या वार्यामुळे विमान लैंडिंगमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. अशा कठीण परिस्थितीत गुरुवारी सायंकाळी इंडिगोचे विमान वेळेप्रमाणे शहराच्या आकाशात दाखल झाले.
ढग आणि वाऱ्यामधून मार्ग काढत, बुधवारच्या अडचणी लक्षात घेऊन वैमानिकाने अतिशय कौशल्याने विमानावर नियंत्रण ठेवत सुरक्षित लँडिंग केले. काही क्षणांसाठी प्रवाशांचे हृदय धडधडले असले तरी सर्व प्रवासी सुखरूपपणे विमानतळावर पोहोचले.
या घटनेमुळे वैमानिकाच्या कौशल्याचे आणि नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांच्या समन्वयाचे कौतुक करण्यात येत आहे. हवामानामुळे विमान वाहतुकीवर अजून काही दिवस परिणाम होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.