Increase Municipal Corporation Tankers in Satara-Deolai
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सातारा-देवळाईत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई सुरू आहे. नागरिक एका टँकरसाठी ८०० ते ९०० रुपये मोजत आहेत. तरीही पाणी उपलब्ध होत नसून, महापालिकेने या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा वाढवावा अन्यथा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा माजी महापौर अनिता घोडेले, नंदकुमार घोडेले यांनी निवेदनद्वारे आयुक्त अमोल येडगे यांना बुधवारी (दि. २७) दिला. तसेच महापौर समीर राजुरकर, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडेही मागणी केली आहे.
महापालिकेच्या तिजोरीत सर्वाधिक मालमत्ता कर हा सातारा देवळाईतून जमा होतो. तसेच बांधकाम परवानगीसाठी सध्या सर्वाधिक प्रस्ताव याच भागातून महापालिकेकडे दाखल होत आहेत. त्यातून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होत आहे. या भागात सुमारे ३.५० लाख नागरिक राहातात. परंतु त्यांना अद्यापही सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध होत नाही. नागरिकांना खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते ८०० ते ९०० रुपये प्रतिटँकर पैसे मोजावे लागतात.
त्यामुळे वर्षाला जेवढा टॅक्स महापालिकेला भरावा लागतो. त्यापेक्षा अधिक पैसे हे पाण्यासाठी मोजावे लागत आहेत. पाण्याच्या अडचणीमुळे टॉयलेटलासुद्धा कुलूप लावून बंद ठेवण्याची वेळ या नागरिकांवर आली आहे. यामुळे महिला आणि पुरुषांना उघड्यावर शौचालयाला जावे लागत आहे. महापालिकेचे टँकरही उपलब्ध होत नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.
सातारा दे-वळाईत टँकरची संख्या वाढवून पाणीटंचाईतून मुक्तता करावी नसता पाण्यासाठी नागरिकांचा भव्य मोर्चा महापालिकेवर येईल, असा इशारा माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर विद्यमान नगरसेविका अनिता घोडेले, नगरसेविका सविता कुलकर्णी, नगर-सेवक सिद्धांत संजय शिरसाट, नगरसेविका श्वेता सुमित त्रिवेदी, नगरसेवक पद्मसिंग राजपूत यांनी दिला.