Inadequate facilities, tourists inconvenienced in Verul Cave
सुनील मरकड खुलताबादः जागतिक वारसा स्थळ असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये दिवसेंदिवस पर्यटकांचा ओढा वाढत आहे मात्र या ठिकाणी येणाऱ्या हजारो पर्यटकांचे अपुऱ्या सुविधांमुळे दररोज हाल सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की वेरूळ हे जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी दिवसेंदिवस पर्यटकांचा ओढा वाढत असताना मात्र या ठिकाणी केवळ बारा पर्यटक मार्गदर्शक (गाईड) असल्याने आणि त्या पर्यटक मार्गदर्शकांची फीस ही आवाक्याच्या बाहेर असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांचे मोठे हाल होत असल्याचे दिसून येते आहे. परिणामी दोन दोन तास पर्यटकांना पर्यटक मार्गदर्शकांची वाट पाहावी लागत असल्याने त्यांचा अमूल्य वेळ हा वाया जातो आहे.
त्यातच या ठिकाणी नव्यानेच सुरू केलेल्या ई व्हेईकल्स या केवळ दहा सुरू असून लेणी क्रमांक एक ते ३४ पर्यंत पर्यटकांना पर्यटकांकडून पूर्ण लेणी दाखवण्याची फीस घेतली जाते. मात्र फक्त १६ ते ३४ या लेणी दरम्यानच पर्यटकांना सदरील ई व्हेईकल्सने ने आण करतात. त्यातच एका ठिकाणी जर पर्यटकांची संख्या जास्त झाली तर पर्यटकांमध्ये आपापसात भांडणं लागण्याचे प्रकारही वारंवार घडून येत आहेत.
भारतीय पुरातत्त्व विभागाने १५ इ व्हेईकल्सची मागणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ संबंधित ठेकेदाराने दहाच ई व्हेईकल सुरू केले आहेत. त्यातही चारही ई व्हेईकल्स बंद असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची हाल होताना दिसून येत आहेत. त्यात एकेक गाडीमध्ये १४ पर्यटकांना बसवून नेले जाते संबंधित पर्यटकांचा कुठल्याही प्रकारचा विमा काढलेला नसतो, शिवाय कुठल्याही प्रकारची संरक्षणात्मक बाब लक्षात घेऊन सदरील ही व्हेईकल्स बनवण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.
वेरूळ लेणी समोर असलेल्या गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे. मुख्यतः वेरूळ लेणी ही डोंगराळ भागात असल्याने त्या ठिकाणी साप, विंचू, अजगर, डास मच्छर असे सरपटणारे तसेच जंगली प्राण्यांचादेखील वावर असतो मात्र भारतीय पुरतत्त्व विभागाच्या गार्डन ब्रांच नेतेतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केल्याने तेथील गार्डनमध्ये मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे परिणामी सरपटणारे देखील तेथे आहेत, यामुळे देखील पर्यटकांचा जीव धोक्यात येत असल्याचे दिसून येते.