In Phulambri, the discontent among Congress workers came to the fore, with slogans being raised against MP Kale
फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील जि.प.च्या चार गट तर पं.स.च्या आठ गणांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ४ गटांत ५० तर आठ गणांत ११९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. काँग्रेसच्या नाराज कार्यकर्त्यांनी खासदार कल्याण काळे यांच्या येथील संपर्क कार्यालयात घुसून डॉ. काळे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने खळबळ उडाली होती.
बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील परिसरास यात्रेचे स्वरूप आले होते, प्रत्येक उमेदवाराने आपापल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केले. यात सर्वांत जास्त लक्ष गणोरी गटाकडे
होते. गणोरी गट हा आमदार अनुराधा चव्हाण यांचा गड आहे, त्या दोन वेळेस याच गटातून जि.प. सदस्य होऊन जि.प.च्या सभापती झाल्या होत्या. आता हा गट सर्वसाधारण असल्याने त्यांनी पुतण्या निखिल कल्याण चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तालुक्यात चार गटांपैकी सर्वांत जास्त उमेदवारी अर्ज याच गणोरी गटात आहेत, येथे १२ अर्ज दाखल आहे.
खासदार विरोधात घोषणा
आज उमेदवारी अर्ज सर्वानीच भरले मात्र नेमकी काँग्रेसची उमेदवारी कोणाला हे निश्चित नसल्याने गणोरी गट सोडून सर्वच गटातील कार्यकर्ते हे निराश होते त्यांनी खा. डॉ कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयात येऊन उमेदवारी कोणाची ते स्पष्ट करा असे म्हणत घोषणाबाजी केली. यामुळे काँग्रेस मधील धुसफूस व नाराजी चव्हाट्यावर आली. गणोरी गटात काँग्रेसतर्फे संदीप बोरसे यांची उमेदवारी निश्चित आहे यामुळे निखिल चव्हाण व संदीप बोरसे यांच्यात चुराशीची लढाई होणार आहे.