Imtiaz Jaleel: Allegations against the Guardian Minister presented with evidence
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पालकमंत्र्यांवर केलेले आरोप हे विधिमंडळात उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यावरून आणि पुराव्याच्या कागदपत्रांसह पत्रकार परिषदेत मांडण्यात आलेले आहेत. यात मानहानी आणि बदनामीचा भाग नाही, असे स्पष्टीकरण माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिवाणी न्यायाधीश एम. के. सय्यद यांच्या न्यायालयासमोर दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ ऑगस्ट रोजी होणार आहे.
इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर वतनाची जमीन लाटून त्यावर एक डिस्टलरी उद्योग उभारण्यात येणार असून, या संदर्भातील कंपनीमध्ये पालकमंत्र्यांची पत्नी, मुलगा व एक विकासक संचालक दाखवण्यात आले असल्याचा आरोप केला आहे. यानंतर पालकमंत्री शिरसाट यांनी मानहानीचा दावा दाखल केला असून, त्यावरील सुनावणीवेळी इम्तियाज जलील यांनी पार्टी इन पर्सन स्वतः न्यायालयात बाजू मांडली. यावेळी इम्तियाज जलील यांनी न्यायालयासमोर सांगितले की, पालकमंत्री हे संबंधित वतनाच्या ५ हजार चौरस फुटांवरील भूखंडावर १०५ कोटींचा प्रकल्प उभारणार असून, त्यातून केवळ ९३ जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
या भूखंडाचा मुद्दा विधिमंडळातही गाजला आहे. एका सरकारी वतनाची जागा असल्यासंदर्भान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार करण्यात आली आहे, असे सांगून इम्तियाज जलील यांनी, शिरसाट यांची बाजू मांडणारे अॅड. राजेश काळे यांनी सुरुवातीला आपले वकीलपत्र घेतले, मात्र नंतर त्यांनी एका लघुसंदेशावर आपण हे प्रकरण लढू शकत नसल्याचे कळवले. वास्तविक अॅड. काळे हे पालकमंत्र्यांचे सख्खे मेहुणे असल्यानेच त्यांनी आपल्याकडून अंग काढून घेतल्याचे सांगितले.
त्यावर अॅड. काळे यांनी स्पष्टीकरण देताना, आपल्या संदेशामध्ये आपण वैयक्तिक कारणामुळे असे शब्द वापरून बाजू मांडू शकत नाही, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. शिवाय इम्तियाज जलील यांनी दिलेले शुल्कही परत केले असून, आपण पालकमंत्री शिरसाट यांचे मेहुणे असल्याची बाब सर्वश्रुत आहे, असेही अॅड. काळे यांनी न्यायालयासमोर सांगितले. या प्रकरणावर १७ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी निश्चित केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.