Importance of education in mother tongue in educational policy
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मातृभाषेतून शिक्षण मिळण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये महत्त्व दिले आहे. उच्च शिक्षणामध्येसुध्दा मातृभाषेतून शिक्षण देण्याचा प्रयोग राबविण्यात येत आहे, यासाठी मातृभाषेतून पाठ्यपुस्तक निर्मिती, अनुवादिनी अॅप निर्मिती अशा विविध प्रयोगांमधून मातृभाषेचे प्रभावी शिक्षण मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रा. अनिल सहस्रबुध्दे यांनी केले.
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स.भु. चे सरचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे होते. डॉ. सहस्रबुध्दे पुढे म्हणाले, अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेतर्फे १२ प्रादेशिक भाषांमधून अभियांत्रिकी शिक्षण दिले जात आहे. त्यासाठी अनुवादिनी नावाची नवीन संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
ज्याद्वारे इंग्रजी भाषेतील तांत्रिक ज्ञान आणि संकल्पना या प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित करण्यात येत आहेत. इंग्रजीच्या भयामुळे उच्च शिक्षणातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी हा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. पुणे येथील एका अभियांत्रिकी संस्थेतील विद्यार्थ्यांनी मातृभाषा मराठीतून शिक्षण पूर्ण करून उत्तम प्रकारचे वेतन प्राप्त करत आहेत असे त्यांनी सांगिले.
या कार्यक्रमास स. भु. चे पदाधिकारी, संस्थेच्या महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. समारोप प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे यांनी केला. सूत्रसंचालन डॉ. अमृता वाकळे यांनी केले. वक्त्यांचा परिचय प्राचार्य डॉ. सतीश पाटील यांनी करून दिला.
विकसित भारत संकल्पना
विकसित भारत ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी उच्च शिक्षणात नावीन्यपूर्ण प्रयोगांची आवश्यकता आहे. त्यामध्ये अभ्यासक्रमात नित्यनियमाने बदल करणे तसेच तो अद्ययावत करणे अपेक्षित आहे. त्यासाठी उच्च शिक्षणातील सर्व सहभागी घटक जसे प्राध्यापक, शैक्षणिक संस्था व विद्यापीठे यांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपली शिक्षणपध्दती ही परीक्षाकेंद्री होती. परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये ती कौशल्य विकसित करणारी पध्दती म्हणून विकसित होत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हादेखील प्रयोग असून त्यात सातत्याने सुधारणा घडून येत आहेत, असेही त्यांनी सांगितले