Impersonator IAS Kalpana Bhagwat to be produced in court today
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: तब्बल १३ दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर तोतया आयएएस अधिकारी म्हणून मिरवणाऱ्या कल्पना भागवतला आज शनिवारी (दि.६) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आयएएस दर्जाचा खोटा आव आणून, सरकारी अधिकाराचा दिखावा करत, राजकीय व प्रशासकीय व्यक्तींशी संपर्क वाढवतानाच आर्थिक व्यवहार साध्य करण्याचा तिचा डाव उघड झाला.
बोगस महिला आयएएसचे कारनामे
आहे. २२ नोव्हेंबर रोजी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिस, एटीएस, आयबी व सीआयडी या चार यंत्रणांनी संयुक्तरीत्या तिची चौकशी केली. त्यात उच्चस्तरीय सरकारी पदांचे बनावट लेटरहेड, संपादित आधारकार्ड, खोटी ओळखपत्रे, तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून राहण्याचा बडेजाव हा संपूर्ण कट पूर्वनियोजित फसवणुकीचा भाग असल्याचे तपासात समोर आले.
पाक-अफगाण कनेक्शनची उकल
कल्पनाच्या फोनमधून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील ११ संशयास्पद क्रमांक सापडल्याने तपासाला आंतरराष्ट्रीय वळण मिळाले. त्यानंतर तिचा अफगाणी मित्र मोहम्मद अशरफ खील आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचा तोतया ओएसडी डिम्पी ऊर्फ देवेंद्रकुमार हरजाई यांना दिल्लीहून अटक करण्यात आली. या तिघांमध्ये आर्थिक व्यवहार असल्याचे प्राथमिक पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. अशरफ आणि डिम्पीची समोरासमोर शुक्रवारी (दि.५) पोलिसांनी चौकशीही केली.
आणखी नवे कारनामे उघड होण्याची शक्यता
फसवणूक, बनावट दस्तऐवज, सरकारी पदाचा खोटा आव, डिजिटल पुरावे, आर्थिक गुन्हे आणि परदेशी संपर्क, सर्व डिजिटल फॉरेन्सिक, आर्थिक ट्रेल आणि विदेशी संवादावरून या प्रकरणात आणखी नवे धागे समोर येण्याची दाट शक्यता आहे. या त्रिकुटाने राजकीय नेते, उद्योजक, व्यापारी आणि काही उच्चपदस्थांना विश्वासात घेऊन शासकीय प्रकल्प मिळवून देणे, ट्रान्सफर-पोस्टिंगमध्ये मदत करणे, मोठ्या गुंतवणूक संधी उपलब्ध करून देणे, काहींना पद्मश्री पुरस्कार, राज्य सभा मिळवून देणे अशा बहाण्यांनी काहींकडून पैसेही उकळले आहेत.
अनुत्तरित प्रश्न
१) डिम्पी हरजाईच्या बँक खात्यात काय मिळाले?
२) केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नावाने या त्रिकुटाने कोणती कामे केली ?
३) तोतयेगिरीच्या टोळीतील व डिम्पीचे दिल्लीतील अन्य साथीदार कोण?
४) कल्पना भागवतला हॉटेलमध्ये भेटायला येणारे कोण?
५) शिर्डी, राहता येथील शेटे आणि लोढा, पुणे येथील निखिल भाकरे कुठे
आहेत?
६) तोतयेगिरी पुरते प्रकरण मर्यादित आहे की राष्ट्रीय सुरक्षेला सुरुंग लावले?