Verul Teacher Gold Chain Snatching Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Robbery Sambhajinagar | पोलिस असल्याची बतावणी करून शिक्षकाला लुटले; दोन सोन्याच्या अंगठ्या लंपास

दुचाकीवरून शाळेकडे जाणाऱ्या शिक्षकाला अडवून हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या जबरदस्तीने काढून घेतल्या

पुढारी वृत्तसेवा

Verul Teacher Gold Chain Snatching

वेरूळ : पोलिस असल्याची बतावणी करून दुचाकीवरून शाळेकडे जाणाऱ्या शिक्षकाला अडवून त्याच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या जबरदस्तीने काढून घेतल्या. ही घटना गल्लेबोरगावजवळ देवगाव रंगारी रस्त्यावर सोमवारी (दि. २१) घडली. या घटनेनंतर दोन्ही संशयित दुचाकीवरून पसार झाले.

मनोज भास्कर अमृतकर असे या घटनेतील शिक्षकाचे नाव आहे. अमृतकर हे गल्लेबोरगाव येथून कन्नड तालुक्यातील देभेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दुचाकीवरून जात होते. सकाळी सुमारे ९.१५ वाजता ते एकटेच शाळेकडे निघाले असताना देवगाव रंगारी रस्त्यावर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांची दुचाकी आडवी लावून त्यांना अचानक थांबविले.

यानंतर संशयितांनी ‘आम्ही पोलिस आहोत. परिसरात चोऱ्या होत आहेत. तुम्ही सोन्याच्या अंगठ्या घालून का फिरता?’ असे म्हणत अमृतकर यांच्यावर दबाव आणला. पोलिस असल्याच्या बतावणीमुळे अमृतकर काही समजण्यापूर्वीच दोघांनी त्यांच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या जबरदस्तीने काढून घेतल्या.

अंगठ्या लंपास केल्यानंतर संशयितांनी क्षणाचाही विलंब न करता दुचाकीवरून घटनास्थळावरून पळ काढला. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे अमृतकर यांना धक्का बसला. त्यांनी तातडीने खुलताबाद पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात संशयितांचा शोध सुरू केला असून, घटनास्थळाच्या मार्गावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. पोलिस असल्याचे भासवून शिक्षकाच्या अंगठ्या लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT