IMA Healthy City Marathon held with great enthusiasm
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
आयएमएतर्फे आयोजित पहिलीच आयएमए हेल्दी सिटी मॅरेथॉन २०२६ रविवारी (दि.१) सकाळी मोठ्यात उत्साहात पार पडली. आरोग्य, तंदुरुस्ती आणि प्रतिबंधात्मक वैद्यकशास्त्राचा ठोस संदेश देणाऱ्या या उपक्रमाला समाजातील विविध घटकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. डॉक्टर, कर्मचारी, सामान्य नागरिक, पाच वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांसह साडेचारशेहून स्पर्धकांनी भल्या पहाटे धाव घेत आरोग्य सर्वांसाठी हा संदेश प्रभावीपणे दिला.
आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनुपम टाकळकर यांच्या संकल्पनेतून आयोजित मॅरेथॉनची सुरुवात उत्साहवर्धक प्री वर्कआउट सत्राने झाली. यानंतर घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, आयएमए अध्यक्ष डॉ. टाकळकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवत सुरुवात करण्यात आली. १० किमी., ५ किमी आणि ३ किमी अशा विविध गटात विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्ष डॉ. टाकळकर, सचिव डॉ. योगेश लक्कस, कोषाध्यक्ष व आयोजन अध्यक्ष डॉ. शिवाजी पोळे, डॉ. यशवंत गाडे, माजी अध्यक्ष डॉ. दत्ता कदम, डॉ. आसावरी टाकळकर, डॉ. अंजली गाडे तसेच संयुक्त सचिव डॉ. गितेश दलवी (क्रीडा) व डॉ. संभाजी चिंतळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
डॉक्टर-नागरिक एकत्रित धावले
सामाजिक जाणिवेतून ही पहिली मॅरेथॉन म्हणजे आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी डॉक्टर आणि नागरिकांनी एकत्र धावले, हीच या उपक्रमाची खरी ताकद आहे. शहराला आरोग्य दायी जीवनशैलीचा संदेश देत हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे अभिमान डॉ. टाकळकर यांनी व्यक्त केले.
आरोग्यसाठी धाव, ही काळाची गरज : डॉ. सुक्रे
हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती घाटीचे अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांनी अशा उपक्रमांमुळे समाजात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित होते. त्यामुळे डॉक्टर आणि नागरिकांनी एकत्र येऊन आरोग्यासाठी धावणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.