Accident News : मंगरूळ फाट्याजवळ अवैध वाळू वाहतुकीने घेतला दोघांचा बळी ! file photo
छत्रपती संभाजीनगर

Accident News : मंगरूळ फाट्याजवळ अवैध वाळू वाहतुकीने घेतला दोघांचा बळी !

भरधाव हायवाची दुचाकीला धडक; कुंकू-टिळ्याच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या चुलत भावांवर काळाचा घाला

पुढारी वृत्तसेवा

Illegal sand transportation claims two lives near Mangrul Phata!

करमाड, पुढारी वृत्तसेवा : सुखना नदीपात्रातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव हायवाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याची भीषण घटना घडली आहे. करमाड-पिंपरीराजा मार्गावरील मंगरूळ फाट्याजवळ रविवारी (दि. २२) दुपारी एकच्या सुमारास झालेल्या या अपघातात दोन तरुणांचा करुण अंत झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अभिषेक पुनमचंद बिमरोट (वय २६) आणि अर्जुन कालुसिंग बिमरोट (वय २०, दोघे रा. नागुनीची वाडी) अशी मृत तरुणांची नावे असून, प्रकाश कांतिलाल बिमरोट (वय ३०) हा गंभीर जखमी झाला आहे. तिघेही चुलत भाऊ असल्याने या दुर्घटनेने संपूर्ण नागुनीची वाडी गावावर शोककळा पसरली आहे.

अभिषेक बिमरोट अर्जुन बिमरोट मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक, अर्जुन आणि प्रकाश हे तिघे चुलत भाऊ रविवारी दुपारी दुचाकीने (एमएच २० एचएल ०९७६) नागुनीची वाडी येथून जोडवाडीकडे एका कुंकू-टिळ्याच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. करमाड-पिंपरीराजा मार्गावरील मंगरूळ फाट्याजवळ पोहोचताच समोरून अवैध रेती घेऊन भरधाव येणाऱ्या हायवाने (एमएच २०-९३७४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, तिघेही रस्त्यावर दूरवर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना पाचारण करून जखमींना रुग्णवाहिकेद्वारे घाटी रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर अभिषेकला मृत घोषित केले, तर उपचारादरम्यान अर्जुनचीही प्राणज्योत मालवली. गंभीर जखमी झालेल्या प्रकाश याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उशिरा रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रशांत नांदवे, संजय सपकाळ आणि अतुल गीते पुढील तपास करत आहेत.

दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर; एकुलते एक मुलगे हरपले

या अपघातात मृत्युमुखी पडलेले अभिषेक आणि अर्जुन हे दोघेही आपापल्या आई-वडिलांचे एकुलते एक मुलगे होते. अभिषेकच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक लहान मुलगी, तर अर्जुनच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. घरातील कर्ते आणि एकुलते एक मुलगे अचानक निघून गेल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उशिरा रात्री दोन्ही तरुणांवर गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अवैध वाळू वाहतुकीविरोधात संताप

पिंपरीराजा परिसरात सुखना नदीतून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रेतीच्या वाढत्या मागणीमुळे या मार्गावर दिवसरात्र ट्रॅक्टर आणि लहान हायवा भरधाव वेगाने धावत असतात. अनेक वाहनांचे क्रमांकही जाणीवपूर्वक खोडण्यात आले असून, दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच आज दोन तरुणांचा बळी गेल्याची संतप्त भावना व्यक्त करत, अवैध वाळू माफियांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT