नायगाव येथील गोदावरी नदीतून सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करीवर पोलिसांची कारवाई
तीन ट्रॅक्टर, यारी मशीन व वाहनासह १२.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त
चार वाळू तस्करांविरोधात गुन्हा दाखल
अवैध वाळू वाहतुकीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान व पाईपलाईन फुटण्याच्या तक्रारी
दि. २६ जानेवारी रोजी पहाटे पैठण पोलिसांचा नदीपात्रात छापा
पैठण : पुढारी वृत्तसेवा
पैठण तालुक्यातील नायगाव येथील गोदावरी नदीतून दररोज रात्री मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करीविरोधात पैठण पोलिसांनी कडक कारवाई करत तब्बल १२ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार वाळू तस्करांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा व वाहतूक सुरू होती. या अवैध वाळू तस्करीमुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत असून पाण्याच्या पाईपलाईन फुटण्याच्या तक्रारीही वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पैठण पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २६ जानेवारी रोजी पहाटे पैठण पोलीस पथकाने नायगाव येथील गोदावरी नदीपात्रात अचानक छापा टाकला.
या कारवाईत गौतम कारभारी बल्लाळ (रा. चनकवाडी), हनुमान सदाशिव गिरगे (रा. नायगाव), गणेश सदाशिव गिरगे (रा. वडवळी) आणि तीर्थराज दत्तात्रय गिरगे (रा. नायगाव) हे तीन ट्रॅक्टरला यारी मशीन लावून अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक करताना आढळून आले.
पोलीस पथकाने पंचनामा करून तीन ट्रॅक्टर, वाळू उपशासाठी वापरण्यात येणारी यारी मशीन तसेच एक ब्रास वाळू वाहतूक करणारे छोटे वाहन असा एकूण १२ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार राजेश आटोळे करीत आहेत.