छत्रपती संभाजीनगर: अमेरिकेतील लोकांना टॅक्स चोरीची भीती घालून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर एमआयडीसी सिडको पोलिसांनी सोमवारी (दि. २७) रात्री एक वाजेच्या सुमारास छापा मारून पर्दाफाश केला. गुजरात, पश्चिम बंगालमधील सहा प्रमुख आरोपी रॅकेट चालवीत होते. अमेरिकन्सशी संवाद साधण्यासाठी रात्रपाळीत काम करण्यासाठी नागालँड, सिक्कीमसह नॉर्थ ईस्टच्या तरुण-तरुणींना नेमले होते. कारवाईत ११६ जणांना अटक केली. ही कारवाई मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.
रॅकेट चालविणारे भावेश प्रकाश चौधरी (३४, रा. अहमदाबाद), भाविक शिवदेव पटेल (२७, रा. मुंबई), सतीश शंकर लाडे (३५, रा. अहमदाबाद), वलय पराग व्यास (३३, रा. अहमदाबाद), अजय ठाकुर आणि मनवर्धन चौधरी तर जॉन हा टोळीचा सर्वोच्च प्रमुख असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांना एमआयडीसी चिकलठाणा भागातील युनिव्हर्सल शाळेच्या समोर असलेल्या कनेक्ट इंटरप्राइजेस या इमारतीत आयआरएस इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिस इन्वेस्टीगेशन डिपार्टमेंन्ट नावाने बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली होती. छापा मारल्यानंतर हॉलमध्ये शंभरहून अधिक तरुण-तरुणी लॅपटॉप संगणकावर हेडफोन लावून कॉलवर बोलताना दिसले. चौकशीत अमेरिका व परदेशातील नागरिकांना करासंबंधी माहिती चोरून त्यांना मोबाईलवर, ईमेल, अथवा एसएमएसद्वारे कर चुकविल्याचे बनावट मेसेज पाठविले जायचे. त्यात संपर्क क्रमांक दिला जायचा. परदेशी नागरिक घाबरून त्यावर कॉल करायचे.
हे कॉल चिकलठाणा एमआयडीसी मधील या कॉल सेंटरवर वळते होऊन यायचे. त्यांना इंग्रजी भाषेत तयार केलेली स्क्रिप्ट वाचून दाखविली जायची. तडजोड करण्यासाठी तयार करून तो कॉल क्लोजर करणाऱ्या दुसऱ्या साथीदाराकडे ट्रान्स्फर केला जायचा. क्लोजर परदेशी नागरिकाला अमेझॉन गिफ्ट कार्ड, ऍपल आयट्यून्स कार्ड, झेले, वेस्टर्न युनियन इत्यादी कार्ड विकत घेण्यास सांगून त्यावर नंबर कळविण्यास सांगायचे. नंबर मिळताच टोळी कार्डमधील पैसे डॉलर स्वरूपात अन्य साथीदारांकडे वळते करायचे. याप्रकरणी एपीआय भरत पाचोळे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, प्रभारी पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, प्रशांत स्वामी, पंकज अतुलकर, पोलिस निरीक्षक गीता बागवडे, अतुल येरमे, स्वाती केदार, शिवचरण पांढरे, सोमनाथ जाधव यांच्या मार्गदशनाखाली करण्यात आली. दरम्यान, सहा आरोपींना सहा नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.
टोळीचा प्रमुख जॉन, भारतात फारुकीवर जबाबदारी
अमेरिकन डॉलरचे क्रिप्टो करंसीच्या माध्यमातून रुपयात रूपांतरित केले जायचे. हवालामार्फत पैसे भारतात यायचे. कॉल सेंटरचा सेटअप व परकीय नागरिकांचा डेटा टोळीतील आरोपी अब्दुल फारूक मुकदूम शहा ऊर्फ फारुकी हा देतो. हे सर्व टोळी जॉन नावाच्या व्यक्तीसाठी काम करते.
लुटीच्या पैशातून टक्केवारीने वाटप
अमेरिकन व युरोपियन देशातील नागरिकांची आर्थिक फसवणूक करून लुटलेल्या पैशांपैकी टोळीप्रमुख जॉन याला ४५ टक्के तर ५५ टक्के हिस्सा फारुकी व अन्य साथीदार व्यास, भावेश चौधरी, सतीश लाडे हे घ्यायचे. त्यातून ही टोळी काम करणाऱ्या सर्व साथीदारांना पैशांचे वाटप करायचे.
कॉल सेंटरचे आंतरराज्यीय जाळे
प्राथमिक तपासात हे कॉल सेंटर अहमदाबाद, कोलकाता व मुंबई येथील मुख्य नेटवर्कशी जोडले असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी गुजरात किंवा इंदौर येथे या टोळीवर कारवाई झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे कॉल सेंटर सुरू केले होते. संशय येऊ नये यासाठी खिडक्यांना काळे पडले लावण्यात आले होते.
डार्कनेट, सॉफ्टवेअरचा वापर
आरोपी peoplefinder. com, whitepages. com सारख्या वेबसाइट्सवरून अमेरिकन नागरिकांची वैयक्तिक माहिती मिळवत आणि त्या आधारे फसवणूक करत होते.
लुटीच्या वेगवगेळ्या पद्धती
इंटर्नल रेव्हेन्यू सर्व्हिस या कॉल सेंटरमधून अमेरिका व इतर परदेशी कर विभागांच्या नावाने बनावट कॉल करून अमेरिकन नागरिकांना कर थकबाकी किंवा पेनल्टी भरण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून अमेझॉन गिफ्ट कार्ड, ऍपल आयट्यून्स कार्ड, झेले, इस्टर्न युनियन अशा माध्यमांतून डॉलरच्या स्वरूपात पैसे उकळले जात होते. सिझननुसार यांचे फसवणुकीचे फंडे होते. सध्या अमेझॉन खात्यातून फ्रॉड झाल्याचे सांगून लुटले जात होते.
100 हून अधिक लॅपटॉप, मोबाईलसह पुरावे जप्त
अनेक संगणक, लॅपटॉप, हेडफोन, स्क्रिप्ट्स, बनावट टॅक्स रिसीट्स, अमेरिकन कोर्ट व अमेरिकन पोलिस अधिकाऱ्यांचे आयकार्ड, दस्तऐवजांच्या बनावट प्रती, तसेच क्रिप्टो ट्रान्सॅक्शनचे पुरावे जप्त करण्यात आले.