Sambhajinagar News : सोशल मीडियावर 'भाईगिरी' कराल तर थेट जेलमध्ये जाल file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : सोशल मीडियावर 'भाईगिरी' कराल तर थेट जेलमध्ये जाल

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांचा कडक इशारा

पुढारी वृत्तसेवा

If you do 'Bhaigiri' on social media, you will go straight to jail

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी घातक शस्त्रांचे प्रदर्शन करून गुन्हेगारी टोळ्यांचे उदात्तीकरण करणारे आणि सोशल मीडियावर रिल्स बनवून सामान्य जनतेत भीती पसरवणाऱ्या कुख्यात गुन्हेगारांवर पोलिसांनी बडगा उगारला आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार सायबर पोलिसांनी सोशल मीडिया पेट्रोलिंग करत कुख्यात टिप्या, पवन दिवेकर आणि त्याच्या समर्थकांवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये चार गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

न्यायालय परिसर, मध्यवर्ती कारागृह (हसूल) आणि पोलिस कैदी वाहनांचे बेकायदेशीर चित्रीकरण करून गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे रिल्स इन्स्टाग्रामवर अपलोड करणाऱ्या पवन दिवेकर आणि जावेद शेख ऊर्फ टिप्या यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर पुंडलिकनगर, मुकुंदवाडी आणि क्रांती चौक पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच, या आरोपींचे सोशल मीडिया अकाउंट्स देखील कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार, उपआयुक्त (गुन्हे) शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव व त्यांच्या पथकाने केली.

९५ गुन्हेगारांची 'हवा' गुल

सायबर पोलिसांनी १ मे २०२६ ते आजपर्यंत अशा एकूण ९५ गुन्हेगारांचे सोशल मीडिया अकाउंट्स हटवून त्यांची 'हवा' गुल केली आहे. चिथावणीखोर संगीत वापरून, घातक शस्त्रांचे प्रदर्शन करत गुन्हेगारी कृत्यांचे समर्थन करणारे रील्स बनवून तरुणांना गुन्हेगारीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न या आरोपींकडून सुरू होता. सायबर पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार येताच, त्यांनी थेट सार्वजनिक शांतता भंग करणे, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणे आणि तरुणांना चिथावणी देणे या गंभीर कलमांन्वये एकाच वेळी ४ गुन्हे दाखल केले आहेत.

नागरिकांना आणि तरुणांना आवाहन सोशल मीडिया हे अभिव्यक्तीचे माध्यम आहे, गुन्हेगारीचे ग्लॅमरायझेशन करण्याचे नाही. कोणत्याही गुन्हेगाराचे समर्थन करणारे रिल्स, पोस्ट किंवा व्हिडिओ लाईक, शेअर अथवा फॉरवर्ड करू नयेत. जे लोक शस्त्रांचे प्रदर्शन करतील किंवा गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्या रील्स बनवतील, त्यांच्यावर डिजिटल पाळत ठेवून थेट गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT