

Ashtatirtha Mahadev temples in a dilapidated state due to the passage of time
रमाकांत बन्सोड
गंगापूर : दक्षिण गंगा गोदावरी आणि अमृतवाहिनी प्रवरा या दोन नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेल्या कायगाव टोका परिसराला पौराणिक, ऐतिहासिक आणि स्थापत्यकलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत अठराव्या शतकात पेशव्यांनी उभारलेली काळ्या पाषाणातील महादेवाची प्राचीन मंदिरे आज मात्र काळाच्या ओघात दुर्लक्षित होत आहेत.
परिसरातील अष्टतीर्थांपैकी काही मंदिरे भग्नावस्थेत पोहोचली असून, उर्वरित मंदिरांचीही पडझड सुरू आहे. त्यामुळे हा अमूल्य वारसा नष्ट होण्यापूर्वी पुरातत्त्व विभागाने तातडीने हस्तक्षेप करून मंदिरांचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन व संवर्धन करावे, अशी मागणी पुढे येत आहे.
कायगाव टोका परिसर दंडकारण्याचा भाग असल्याचे मानले जाते. दक्षिणापथात मार्गक्रमण करताना प्रभू श्रीराम येथे आले होते, असे विविध अभ्यासकांच्या लिखाणातून समोर आले आहे. संत एकनाथांच्या रामायणातही प्रभू श्रीरामाने मायावी हरणाचा पाठलाग केलेल्या गोदावरी परिसराचा उल्लेख आढळतो. पुण्याचे वैमानिक भावे, श्रीराम पथाचे अभ्यासक राम अवतार शर्मा तसेच जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण लिखाणात कायगाव टोका परिसराचा श्रीरामाच्या पदस्पर्शाशी संबंध असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पेशव्यांनी उभारली महादेव मंदिरांची शृंखला
अठराव्या शतकात पेशव्यांनी येथे महादेवाची अनेक मंदिरे उभारली. काळ्या पाषाणात कोरीव नक्षीकाम करून हेमाडपंती स्थापत्यशैलीचा प्रभाव असलेल्या या मंदिरांमध्ये शिल्पकलेचे अप्रतिम नमुने पहायला मिळतात. कायगाव परिसरात रामेश्वर आणि मुक्तेश्वर, तर टोका परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, संगमेश्वर, गौतमीश्वर आणि म्हाळेश्वर अशी मंदिरे उभारण्यात आल्याचे सांगितले जाते. या मंदिरसमूहाला अष्टतीर्थ म्हणूनही ओळखले जाते. यातील रामेश्वर, सिद्धेश्वर आणि घटेश्वर ही मंदिरे स्थापत्यवैभव आणि भव्यतेचा प्रत्यय देतात. मात्र संगमेश्वर व म्हाळेश्वर मंदिरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून, इतर मंदिरांनाही काळाच्या झळा बसत आहेत.
नेवासे परिसरातील काळ्या पाषाणाचा वापर
या मंदिरांच्या बांधकामासाठी नेवासे परिसरातील खाणींमधून आणलेल्या काळ्या पाषाणाचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जाते. मंदिरांभोवती तत्कालीन काळात नगरी वसल्याचेही पुरावे आढळतात. त्यामुळे हा परिसर केवळ धार्मिक स्थळ नसून तत्कालीन स्थापत्य, सामाजिक जीवन आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरतो. नाशिक परिसरातील प्राचीन मंदिरांच्या स्थापत्यशैलीशी कायगाव टोका येथील मंदिरांची शैली साधर्म्य दर्शवते. त्यामुळे या मंदिरांचा स्वतंत्र पुरातत्त्वीय आणि स्थापत्यशास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे.
सिद्धेश्वर मंदिरात शिल्पकलेचा अप्रतिम आविष्कार
टोका येथील सिद्धेश्वर मंदिर हा तीन मंदिरांचा समूह आहे. येथे भगवान विष्णू, महादेव आणि गद्रादेवी यांची मंदिरे आहेत. त्यातील देवी मंदिरावरील शिल्पकला विशेष लक्षवेधी आहे. चांदणी आकाराच्या या मंदिरावर नवार्ण देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत.
सिद्धेश्वर मंदिराच्या वास्तूवर दशावतार, पुराणातील विविध प्रसंग तसेच पेशवे दरबाराचे चित्रण करणारी शिल्पे पहायला मिळतात. गोदावरी-प्रवरा संगमावर भाविकांच्या स्नानासाठी घाट आणि भव्य हत्तीघाटही बांधण्यात आला आहे. या सर्व वास्तू तत्कालीन स्थापत्यकौशल्य आणि धार्मिक-सांस्कृतिक जीवनाचा इतिहास सांगतात. सिद्धेश्वर मंदिर परिसराचा राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केल्याचेही इतिहासात नमूद केले जाते. त्यामुळे पेशवेकालीन बांधकाम आणि अहिल्याबाई होळकरांच्या जीर्णोद्धाराचा वारसा या परिसरात एकत्रित पहायला मिळतो.