भारतातील इतर प्रांताप्रमाणेच हैदराबाद संस्थानालाही दुष्काळाची मोठ्या प्रमाणात झळ सहन करावी लागली, अशी इतिहासात नोंद आहे. या भागात सतराव्या शतकात तीन वेळा दुष्काळ पडले, १६२९, १६५९ आणि १६८५ मध्ये. अठराव्या शतकातही १७१३, १७४७ आणि १७८७ मध्ये दुष्काळाशी सामना करावा लागला.
एकोणिसाव्या शतकात १८०४, १८१३, १८१९, १८३३, १८४६, १८५४, १८६२, १८६६, १८७१, १८७६-७७, १८९६-९७ आणि १८९९-१९०० असे बारा दुष्काळ पडले. यासंबंधीच्या नोंदी ब्रिटीश सरकारच्या दस्ताऐवजात सापडतात. १८७६-७७ चा अहवाल उपलब्ध आहे. त्यावरून तत्कालिन काळातील भीषणता लक्षात येते.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीनंतर चार वर्षांनी १८०४ मध्ये लिंगसुगुर, रायचूर, नगर-कर्णूल (महबूब नगर), औरंगाबाद, हैदराबाद, बीड, बिदर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती होती. लिंगसुगुरच्या तालुकदाराने आपल्या अहवालात म्हटले आहे की, दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पीक पूर्णपणे वाया गेले आणि 'रागी' हे गरिबांसाठी असणारे धान्य इतके दुर्मिळ झाले की, त्याचा दर प्रति रुपया साठ शेर वरून आठ शेर आणि त्यानंतर प्रति रुपया अडीच शेर इतका वाढला, असे मानले जाते. (एक शेर म्हणजे सरासरी एक किलो).
सुमारे २०,००० लोकांनी अधिक सुस्थितीत असलेल्या भागाकडे स्थलांतर केले; तथापि, त्यापैकी बहुतांश लोक परिस्थिती सुधारल्यावर आपापल्या घरी परतले. यात जीवितहानी फारशी झाल्याचे दिसत नाही आणि तुलनेने कमी गावे ओस पडली. हे संकट निवारण्यासाठी काही उपाययोजना केल्या गेल्या होत्या का, याबद्दल कोणताही तपशील उपलब्ध नाही. रायचूरच्या तालुकादाराने (तहसीलदार) म्हटले की, रागीचा भाव प्रति रुपया सुमारे तीन शेर होता आणि या दुष्काळात त्या जिल्ह्यातील 'दारा जाह' या जहागीरदाराने गरजू गरिबांमध्ये सुमारे पन्नास हजार रुपये किमतीची ज्वारी वाटली.
प्रत्येक अर्जदाराला दररोज पाऊण पौंड ज्वारी मिळाली. धान्याचे मोफत वाटप करूनही हजारो लोक मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जाते. औरंगाबादच्या तालुकदाराने आपल्या नोंदीत नमूद केले आहे की, त्या काळात त्या जिल्ह्यात पिके अतिशय उत्तम होती आणि ज्वारीचा दरही स्वस्त होता. एका रुपयाला २४० पौंड वजनाचा 'पल्ला' मिळत असे. परंतु, आक्रमणामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव अचानक वाढले.
धान्य आणि तूप यांचा दर 'अर्धा शेर प्रति रुपया' इतका महाग झाला. पावसाचा अभाव आणि मानवनिर्मित विध्वंस या दोन्ही गोष्टींच्या एकत्रित परिणामामुळे ही स्थिती ओढवली होती. अपेक्षित असल्याप्रमाणेच, उपासमारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. हैदराबाद जिल्ह्यातही मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती, तरीही तिथे तुलनेने कमी लोकांचा मृत्यू झाला आणि फारसे स्थलांतरही झाले नाही.
बीडच्या तालुकदारानेही अशाच प्रकारची माहिती दिली आहे; त्या जिल्ह्यातही मोठी आणीबाणीची स्थिती होती आणि ज्वारीचा दर 'दोन शेर प्रति रुपया' इतका होता. काही लोकांनी तर मानवी मांस खाल्ल्याचेही सांगितले जाते. (The Talukdar of Bir writes in the same strain, There was much distress in that district, and jawari sold at two seers per rupoe. Some people are said to have fed upon human flesh. A. J. DUNLOP, FAMINE REPORT)
अन्नाच्या टंचाईसोबतच पिण्याच्या पाण्याचीही कमतरता भासत होती आणि यात हजारो लोकांचा बळी गेल्याचे मानले जाते. बिदरमधील परिस्थितीबाबतची माहितीही जवळपास अशीच होती.