

गंगापूर: छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गावरील कायगाव शिवारात विनापरवाना गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. १९) दुपारी केलेल्या कारवाईत गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल आणि विना क्रमांकाची दुचाकी असा एकूण १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
विनोद विठ्ठल पवार (वय २०, रा. कणकुरी, ता. गंगापूर) आणि स्वप्निल सुभाष पवार (वय २४, रा. दिघी, ता. गंगापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. कायगाव शिवारातील बंद पडलेल्या रसवंतीसमोर, अहिल्यानगरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गावर दुपारी सुमारे २.५० वाजता ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद पवार याच्याकडे अंदाजे ४० हजार रुपये किमतीचा स्टील धातूचा गावठी कट्टा आणि दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आढळली. त्याच्याकडून मोबाईल, तर स्वप्निल पवार याच्याकडून मोबाईल आणि अंदाजे ५० हजार रुपये किमतीची विना क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली.
या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक महेश फुलचंद घुगे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विश्वनाथ फरताडे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.