Husband killed, wife seriously injured in a two-wheeler accident.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दोन दुचाकींचा समोरासमोर झालेल्या धडकेत एका दुचाकीवरील पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास धुळे-सोलापूर महामार्गालगत एका हॉटेल समोर घडला.
या विषयी पोलिसांकडून मिळा-लेली माहिती अशी की, फुलशेवरा (ता. गंगापूर) येथील लता मच्छिद्र काळवणे (४०) या आपल्या पतीसह दुचाकीवर (एमएच-२०-जीएच ९५८१) माहेराहून भावाला भेटून परत फुलशेवरा येथे जात होत्या. सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ते धुळे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या रस्त्याने जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीने (एमएच ५७-ए-१९५६) काळवणे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की, काळवणे यांचे पती गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. लता काळवणे याही गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक फौजदार पठाण करीत आहेत.