

A crowd of tourists to Verul, Khultabad
खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा :
नाताळ सुट्यांच्या पार्श्वभूमीवर आणि सलग चार दिवसांच्या शासकीय सुट्यांचा फायदा घेत देशभरातून भाविक आणि पर्यटकांचा महापूर वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर, श्री भद्रा मारुती मंदिर परिसरात पहावयास मिळत आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील गर्दीच्या उच्चांकांची नोंद असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे, व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, गर्दीमुळे वेरूळच्या इतिहासात प्रथमच भाविकांसाठी मुखदर्शन पद्धत लागू करण्याची वेळ मंदिर प्रशासनावर आली आहे. बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत असून, इतिहासात प्रथमच मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी मुख्य गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शनाची व्यवस्था केली आहे. या निर्णयामुळे जलद दर्शन शक्य होत असले तरी अनेक भाविकांमध्ये नाराजीचे सूरही उमटताना दिसत आहेत.
घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. नाताळ सुट्यांच्या सुरुवातीपासूनच मंदिर परिसरात ही स्थिती आहे. पहाटेच्या आरतीपासूनच मंदिराच्या कुंडाजवळ, पायऱ्यांमध्ये आणि मुख्य प्रवेश द्वाराबाहेर भाविकांचे लोंढे असतात. देशभरातून-विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक येथून भाविक दर्शनासाठी दाखल होताना दिसत आहे.
मंदिर व्यवस्थापन समितीच्या निर्णयानुसार, गाभाऱ्यातील गर्दा आणि ढकलाढकली टाळण्यासाठी गाभाऱ्यात थेट प्रवेश न देता बाहेरूनच दर्शन घेऊन भाविक पुढे जात आहे. गाभाऱ्याच्या समोरील लोखंडी बॅरिकेडिंग उभारून सुरक्षा कडक करण्यात आली आहे. बाहेरून दर्शनाच्या नियमांमुळे भविकांच्या रांगा जलद हलत असल्या तरी अनेक भाविकांनी गाभाऱ्यात जाऊन पिंडीचे प्रत्यक्ष स्पर्शदर्शन न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली.
इतक्या लांबून आलो आणि स्पर्शदर्शन नाही, हे प्रथमच अनुभवतोय, असे काही भाविकांनी सांगितले. तर काहींनी गर्दीचा ताण पाहता प्रशासनाचा निर्णय योग्य असल्याचेही मान्य केले. वेरूळ व कैलास लेण्यांमध्ये पर्यटकंची विक्रमी भेटघृष्णेश्वर दर्शनासोबतच वेरूळच्या कैलास लेण्यांत गर्दी आहे. जागतिक वारसा स्थळ असलेल्या या लेण्यांकडे सुटीचा आनंद घेण्यासाठी स्थानिकांसह देशी-विदेशी पर्यटकांनी गर्दी केल्याचे दिसत आहे.
लेण्यांच्या प्रवेशास तिकीट काऊंटरवर रांगा लागल्याचे दिसून आल्या. शुक्रवारी, शनिवारी व रविवारी अशा तीनच दिवसांत जवळपास ५० हजार तिकीट विक्री झाल्याची नोंद करण्यात आली.
स्वच्छतागृह, पार्किंगची समस्या पर्यटनामुळे स्थानिकांना आर्थिक दिलासा मिळत असला, तरी शौचालये, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि पार्किंगची सुविधांची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे.
याबाबत स्थायी सुविधा आवश्यक आहे, असे पर्यटकांतून व्यक्त करण्यात आले. सुट्यांमध्ये खुलताबाद-वेरूळ पर्यटनाचा नवा इतिहास !
नाताळ-नववर्षाच्या सुट्यांची सुरुवात खुलताबाद व वेरूळ भागासाठी ऐतिहासिक ठरली आहे. मंदिरात पहिल्यांदाच मुखदर्शन व्यवस्था, लेण्यांत विक्रमी उपस्थिती, गावातील सर्व राहण्याची ठिकाणे बुक, पर्यटनामुळे परिसराची प्रसिध्दी वाढत असली तरी व्यवस्थापन, सुविधा व नियोजन बळकट करण्याची गरज आहे.
लॉज, हॉटेल्स हाऊसफुल्ल
पर्यटकांच्या गाड्या वेरूळ-खुलताबाद मार्गावरील दोन्ही बाजूंनी उभ्या असल्यामुळे वाहतुकीची कोंडी सकाळपासूनच होत आहे. सलग चार दिवस सुट्यांमुळे गावातील सर्व लॉज व हॉटेल्स हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले. गर्दीचा परिणाम स्थानिक व्यवसाय व निवास व्यवस्थेवर स्पष्टपणे दिसून आला आहे. खुलताबाद, वेरूळ, एलोरा परिसरातील सर्व लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि धर्मशाळा पूर्णपणे हाऊसफुल्ल आहेत. पर्यटकांना घरगुती पेड लॉजिंगची शोधाशोध करण्याची वेळ आली असल्याचे दिसून येते.