छत्रपती संभाजीनगर : दोन मुलींनंतर तिसऱ्यांदाही पदरात मुलगीच पडणार असल्याचे समजताच सासरच्या मंडळींनी बोगस डॉक्टरांच्या मदतीने एका विवाहितेचा घरातच गर्भपात केला होता. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी पती अरबाज फेरोज सय्यद, सासू आशिया फेरोज सय्यद, सासरा फेरोज मन्सूर सय्यद यांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १७मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी शुक्रवारी (दि.१३) सांगितले.
पीडित विवाहितेला पाच आणि दोन वर्षांच्या दोन मुली आहेत. ती तिसऱ्यांदा पाच महिन्यांची गरोदर असताना, पती अरबाजने जालन्याचा सतीश सोनवणे, कमळ गोकूळ तिनगोटे अन्य एका पुरुषांला घरी बोलावले. याच टोळक्याने घरीच तिची बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी केली.
गर्भात मुलगी असल्याचे स्पष्ट होताच, आर-ोपींनी विवाहितेला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून बळजबरीने गर्भपात केला. इतकेच नव्हे तर घरातच शस्त्रक्रिया करण्याचाही त्यांचा प्रयत्न होता, मात्र पीडितेच्या माहेरच्या लोकांनी वेळीच पोलिसांना पाचारण केल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांना पाहून आरोपी पळून गेले होते. या प्रकरणाचा अधिक तपास एमआयडीसी सिडको ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक कैलास लहाने करीत आहेत.
जालन्याच्या टोळीचे कनेक्शन
हा गर्भपात करण्यासाठी आलेले कमळ तिनगोटे, सतीश सोनवणे आणि अनिल जाधव (सपकाळ) हे सर्व जालन्याचे आहेत. सतीश सोनवणे हा यापूर्वीही अनेक गर्भपात प्रकरणांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, तर अनिल जाधव हा मयूरपार्क भागात महालॅब टेक्निशियन नावाने पॅथॉलॉजी लॅब चालवतो.
घटनेनंतर पसार झालेल्या या तिन्ही मुख्य सूत्रध-ारांच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक जालन्याला रवाना झाले आहे. २०२४ मध्ये गारखेडा परिसरात मनपा पथकाने छापा मारून थोरात मायलेकींच्या अवैध गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश केला होता. त्याप्रकरणातही सतीश सोनवणेला अटक झाली होती
मनपाच्या कंत्राटीने दिला सोनवणेचा नंबर
पती अरबाज तिसरीही मुलगी होऊ नये यासाठी गर्भलिंग निदान करून देणाऱ्या टोळीचा शोध घेत होता. त्यावेळी एका वॉशिंग सेंटरवर आलेल्या मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने अरबाजचे संभाषण ऐकून त्याला मदत केली. त्याने सतीश सोनवणे याच्यासह कमळ तिनगोटेचा नंबर देऊन त्यांची डील करून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.