Huge crowd in markets for Gudi Padwa, Eid
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गुढीपाडवा आणि सध्या त्यापाठोपाठ रमजान ईद आल्याने शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी सुरू आहे. पाडव्यानिमित्त सोने-चांदी, वाहन, इलेक्ट्रॉनिक्ससह गृहउपयोगी वस्तू खरेदीला ग्राहक पसंती देत आहेत. तर, दुसरीकडे ईदनिमित्त सुकामेवा, शिरखुर्मा, नवीन कपडे, चपला-बुटांसह विविध वस्तू खरेदीसाठी झुंबड उडत आहे. रविवारी (दि. १५) सकाळपासूनच बाजारात मोठी गर्दी झाल्याने रात्री उशिरापर्यंत रस्ते गजबजलेले होते.
हिंदू नववर्ष प्रारंभ आणि साडेतीन मुहूर्तातील पहिला मुहूर्त असलेल्या गुढीपाडवा गुरुवारी साजरा केला जाणार आहे. या शुभदिवशी गृहप्रवेश, सोने-चांदी, वाहनांसह नवीन वस्तू खरेदीला विशेष महत्त्व असते. या शुभमुहूर्तावर शुभकार्य म्हणून बहुतांश जण विविध वस्तू खरेदीला मोठी पसंती दिली जाते. त्यामुळे या दिवशी बाजारपेठेत कोट्यावधीची उलाढाल होते.
सध्या उन्हाचा तडाखा वाढत असला तरी लग्नसराई आणि पाडव्यानिमित्त रेडिमेड कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, सराफा बाजारात ग्राहकांची लगबग वाढली आहे. पाडव्याच्या आधी सुटीचा वार असल्याने रविवारी तर सकाळपासूनच बाजारात लगबग सुरू झाली.
मुख्य बाजारपेठेतील पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, रंगारगल्ली, सराफा रोड, मच्छली खडक, शहागंज या भागातील दुकानांमध्ये आणि रस्त्यावरील हातगाड्यांवर देखील मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले.
बाजारात खरेदीसाठी येणारे ग्राहक उन्हापासून बचाव करण्यासाठी खरेदीनंतर थंड पेयाच्या दुकानावरही गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर दोन्ही सणानिमित्त खरेदीसाठी ग्राहकांची एकत्र उड्या पडत असल्याने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत व्यापारी आणि त्यांच्या कामगारांना क्षणभरही उसंत नसल्याचे चित्र बाजारात पहायला मिळत आहे.
ईदसाठी खरेदीची धूम
मुस्लिम बांधवांच्या ईद निमित्ताने बाजारात खरेदीसाठी झुंबड उडत आहे. सुकामेवा, शिरखुर्मा, नवीन कपडे, बेडशीट, चपला-बुटांसह काचेच्या विविध वस्तू खरेदीसाठी शहरातील दुकानांमध्ये गर्दी आहे. मुलांसाठी त्यांच्या आवडीचे कपडे, बूट घेण्याबरोबर पुरुष मंडळी पांढरा, डिझाईनचा पठाणी, शेरवानीला तर, महिलावर्ग रंगबेरंगी बांगड्या, साड्यापासून ते वेगवेगळ्या व्हॅराईटीचे बुरखे खरेदीला पसंती देत आहे. हातगाड्यांवरुनही लाट है सेल है, रस्ते का माल रस्ते मे असे ओरडून विविध वस्तू विकल्या जात आहेत.
महागाईची झळ, व्यापाऱ्यांना भीती
गुडी पाडवा आणि ईद पाठोपाठ आल्याने व्यापाऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे. दोन्ही सणांनिमित्त बाजारपेठा रविवारी रात्री उशिरापर्यंत ग्राहकांच्या गर्दीन बहरलेल्या होत्या. मात्र सध्या निर्माण झालेल्या गॅस टंचाई आणि वाढत्या महागाईची झळ व्यवसायाला बसण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.