

बेळगाव : दसरोत्सवानंतर आलेल्या दीपोत्सवाने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात तेजी निर्माण केली आहे. जीएसटीत घट झाल्यानंतर यंदाची ही पहिलीच दिवाळी ठरली असून ग्राहकांबरोबर व्यापार्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. दिवाळी पाडव्यादिवशी बुधवारी (दि. 22) खरेदीला उधाण आले होते. शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांत दुचाकी, चारचाकी, दागिने, कपडे खरेदीतून सुमारे 300 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे जाणकारांनी सांगितले.
यंदा केंद्र सरकारने केलेल्या जीएसटी कपातीमुळे कपडे, दुचाकी व चारचाकी वाहने तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याने व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. सोने-चांदीने दराचा विक्रम केला असला तरी मागील चार दिवसांत सोने तीन हजार तर चांदी पाच हजारांनी स्वस्त झाली. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, अनेक ग्राहकांनी आणखी दर कमी होईल, या आशेने सोने, चांदी खरेदी करण्याचे टाळले. या उत्सवाला आगामी लग्नसराईसाठी आवश्यक सोनेही खरेदी केले जाते. मात्र यंदाच्या दिवाळीत अनेकांनी आखडता हात घेतला.
बुधवारी पाडव्याला जिल्ह्यात रेडीमेड कपडे, साडी, ड्रेस मटेरियल विक्रीतून सुमारे 25 कोटींची तर सराफ व्यवसायात 100 ते 125 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले. तसेच सुमारे 600 हून अधिक चारचाकी वाहनांच्या विक्रीतून 80 ते 100 कोटींची उलाढाल तर इलेक्ट्रिक व पेट्रोलवरील 1500 दुचाकींची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. दुचाकी विक्रीतून सुमारे 20 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. याशिवाय अन्य वाहनांच्या खरेदीलाही यंदा चांगला प्रतिसाद मिळाला. गतवर्षीच्या दिवाळीच्या तुलनेत यंदा सोने व चांदी खरेदीचे प्रमाण कमी झाल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. यंदा जीएसटीत घट झाल्याचा फायदा ग्राहकांना तसेच व्यापार्यांनाही झाला.