HSR plate: Three lakh vehicle owners registered
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याच्या कामाला वेग दिला असून, आजपर्यंत सुमारे ३ लाख वाहनधारकांनी यासाठी नोंदणी केली आहे. आतापर्यंत एक लाख ८० हजार वाहनांना नंबर प्लेट बसवण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत केंद्राची संख्या वाढवण्यात येणार असल्याने या कामाला आणखी वेग येणार असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
जिल्ह्यात आजघडीला ५५ केंद्र आहेत. यातील ४२ केंद्र शहरात असून, १३ केंद्र ग्रामीण भागात आहेत. ही केंद्र वाहनांच्या मानाने कमी पडत असून, केंद्रांची संख्या वाढवण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवर आरटीओ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यानुसार आरटीओ अधिकाऱ्यांनी संबंधित एजन्सीला लवकरात लवकर केंद्राची संख्या वाढवून या कामाला वेग देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्राची संख्या वाढल्यानंतर नंबर प्लेट बसवण्याच्या कामाला आणखी वेग येणार आहे.
जिल्ह्यातील ५५ केंद्रांपैकी ४२ केंद्र शहरात आहेत. ही केंद्र येथील वाहनांच्या तुलनेत कमी असल्याने वाहनधासरकांना अनेक दिवस वाट पाहावी लागत आहे. त्यातल्या त्यात शहर वगळता पूर्ण ग्रामीण भागांसाठी केवळ १३ केंद्र असल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे काम वेगात आणि वेळेच्या आत व्हावे यासाठी नंबर प्लेट बसवणारे केंद्र वाढवण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
२०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एच.एस.आर.पी.) बसवून घेण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुमारे २ लाख ९५ हजार ५५० वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे. नोंदीत वाहनधारकांपैकी सुमारे १ लाख ७५ हजार ७२ वाहनांना या नंबरप्लेट बसवून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सुमारे ९ लाख ५० हजार वाहने आहेत. अद्यापही ६ लाख ५० हजार वाहनध-ारकांनी नंबर प्लेटसाठी नोंदणीपासून दूरच आहेत. या वाहनधारकांना ३० नोव्हेबरपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे केंद्रांची संख्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.