Horrific accident on Samruddhi Mahamarg; two killed, five critically injured.
लासूर स्टेशन, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका कारचे टायर फुटल्याने वाहन पुलावरील कठडे तोडून सुमारे २० फूट खाली कोसळले. या अपघातात एका महिलेसह आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये हुमेरा मोहसीन शेख (३१, रा. कल्याण) आणि हरिम जुनेद अहमद (८, रा. ठाणे) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (एमएच ०४ एफएफ ५८४०) क्रमांकाची कार कल्याणहून छत्रपती संभाजीनगरकडे समृद्धी महामार्गाने जात होती. डोणगाव परिसरातील ओढ्यावर उभारण्यात आलेल्या पुलाजवळ (चॅनल क्र. ४५६) रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कारचे टायर अचानक फुटल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार पुलावरील संरक्षक कठडे तोडून सुमारे २० फूट खाली कोसळली.
अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश काळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. समृद्धी महामार्गावरील कर्मचाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान हुमेरा शेख आणि हरिम अहमद यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
कारमध्ये दोन पुरुष, दोन महिला, एक मुलगा आणि दोन मुली असा एकूण सात जणांचा प्रवास सुरू होता. उर्वरित जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नव्हती. कारचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, शिल्लेगाव पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.