Horrific accident on Delhi-Mumbai Expressway; 4 youths from Chhatrapati Sambhajinagar die
छत्रपती संभाजीनगर / मंदसौर (मध्यप्रदेश), पुढारी वृत्तसेवा: शहरासह जिल्ह्यातील व्यावसायिक तरुणांच्या कारला मध्यप्रदेशातील मंदसौरनजीक दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेवर गुरुवारी (दि. २५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. पुढे चालणाऱ्या अवजड ट्रकला मागून धडकल्याने झालेल्या या अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी आहेत. हे सर्व तरुण मोबाईलचे सुटे भाग (अॅक्सेसरीज) आणण्यासाठी दिल्लीला जात होते, अशी माहिती सीतामऊ पोलिसांनी दिली.
मृतांमध्ये कारमालक रवींद्र भागवत काळे (२८, रा. बंबाटनगर), संदीप नवनाथ बोरसे (३०, ह. मु. हर्मूल, मूळगाव वारेगाव, ता. फुलंबी), सचिन गंगाधर गजभारे (३७, रा. आंबेडकरनगर, मूळ रा. पूर्णा, जि. परभणी) आणि राजेंद्र भावराव कवडे (४६, रा. चुनाभट्टी, खोकडपुरा) यांचा समावेश आहे. तर अब्दुल खलील अब्दुल समद (३०, रा. छत्रपती संभाजीनगर) आणि उमर इस्माईल जहागीरदार (३२, रा. गंगापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत.
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमालक रवींद्र काळे यांच्या सात आसनी कारमधून (एमएच २० जीई ७३५९) हे सहा जण दिल्लीला मोबाईलचे साहित्य खरेदी करण्यासाठी बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास शहरातून निघाले होते. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेवरून जात असताना मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील तितरोद शिवारात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार थेट पुढे चाललेल्या एका अवजड ट्रकच्या मागील भागात घुसली. ही धडक एवढी भीषण होती की, कारचा पुढचा भाग अक्षरशः चक्काचूर होऊन बोनेट थेट सीटपर्यंत मागे सरकले.
या भीषण अपघातानंतर महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांनी आणि स्थानिकांन तात्काळ बचावकार्य सुरू केले. कारचा पत्र कापून आत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठ तब्बल एक तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि सीतामऊ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना आणि मृतांना कारबाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नातेवाईक मंदसौरकडे खाना
अपघाताची बातमी समजताच शहरासह परिसरातील मृतांचे आणि जखर्मीचे नातेवाईक गुरुवारी दुपारी ३ वाजेनंतर छत्रपती संभाजीनगरहून मंदसौरकडे रवाना झाले आहेत. ते शुक्रवारी पहाटेपर्यंत तेथे पोहोचतील. त्यानंतर मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाइकांच्या ताब्यात दिले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली.
शेवटच्या कॉलवरून मिळाली माहिती
या भीषण अपघातात जागीच ठार झालेला कारमालक रवींद्र काळे याचा मोबाईल अपघातस्थळी सुस्थितीत आढळून आला. पोलिसांनी त्या मोबाईलच्या 'कॉल लॉग'मध्ये ज्या क्रमांकावर शेवटचे बोलणे झाले होते, त्यावर संपर्क साधून या दुर्घटनेची माहिती दिली. त्यानंतर संबंधित मित्राकडून इतर नातेवाइकांना ही दुःखद बातमी समजली.
दोघांचा घटनास्थळीच मृत्यू
अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. उर्वरित चार जणांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना आणखी दोघांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या दोघांना मंदसौर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.