Honeybee Attack : अजिंठा लेणीत पुन्हा मधमाशांचा हल्ला; ३० पर्यटक जखमी file photo
छत्रपती संभाजीनगर

Honeybee Attack : अजिंठा लेणीत पुन्हा मधमाशांचा हल्ला; ३० पर्यटक जखमी

मधमाशांच्या बंदोबस्तासाठी पुरातत्त्व विभाग ठोस भूमिका घेईना, पर्यटकांत संताप

पुढारी वृत्तसेवा

Honeybee Attack at Ajanta Caves Again; 30 Tourists Injured

फर्दापूर पुढारी वृत्तसेवा : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत शनिवारी (दि. २१) दुपारच्या सुमारास चवताळलेल्या आग्या मोहळातील मधमाशांनी पर्यटकांवर अचानक हल्ला चढविल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेत सुमारे ३० पर्यटक जखमी झाले असून, त्यापैकी ९ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींमध्ये महिला पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे.

घटनेनंतर जखमींना तातडीने अजिंठा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. तर ९ गंभीर जखमी पर्यटकांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे हलविण्यात आले.

शनिवारी विकेंड आणि रमजान ईदची सुट्टी एकत्र आल्याने सकाळपासूनच लेणी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी उसळली होती. दुपारपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत सुरू असताना दुपारी सुमारे ४.३० वाजता सप्तकुंड धबधबा परिसरात अचानक मधमाशांचा मोठा थवा पर्यटकांवर तुटून पडला.

या अनपेक्षित हल्ल्यामुळे घाबरलेल्या पर्यटकांनी आरडाओरडा करत सैरावैरा धाव घेतली. यामुळे काही काळ लेणी परिसरात भीती व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत जखमींना अजिंठा ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. अजिंठा ग्रामीण रुग्णालयात पठाण आणि यास्मिन अरबाज पठाण (सर्व रा. अजिंठा, ता. सिल्लोड) यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील वैद्यकीय उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे रवाना करण्यात आले. ईदच्या सुट्टीमुळे विदेशी पर्यटकांसह छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा आणि जालना या जिल्ह्यांतील पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली.

वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद मामीडवार यांनी जखमींवर वैद्यकीय उपचार केले. तर गंभीर जखमी असलेल्या अरबाज बुढन पठाण (२७), साहिल पठाण (२५), अजमत अरबाज पठाण (४ महिने), हिना पठाण, मोहसिना पठाण, तंजीम खान पठाण, महक पठाण, सईदाबी बुढन होती. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

पुरातत्त्व विभाग ठोस उपाययोजना करेना

अजिंठा लेणीत मधमाशांच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने पर्यटनावर विपरीत परिणाम होत आहे. विशेष म्हणजे मधमाशांचे हल्ले वारंवार होत आहेत. मात्र, मधमाशांचे हल्ले पर्यटकांवर होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत असल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग आणि वनविभागाने संयुक्तरीत्या ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यटक, स्थानिक नागरिक आणि पर्यटन व्यावसायिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT