कन्नड : जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढ्या आणि नाले दुथडीभरुन वाहत आहेत. यावेळी सोमवारी (दि.2) पाच वाजेच्या सुमारास हिवरखेडा नांदगीरवाडी येथे एक तरुण आपल्या दुचाकीवरून नाल्यावरील पूलावरून स्टंटबाजी करत असताना पाण्यातून वाहत गेला. पाण्यातून ते दोनशे फूट वाहून जात नाल्याच्या कडेला असलेल्या झाडाची फांदी हाताला लागल्याने ग्रामस्थांच्या सतर्कपणामुळे सदर इसमाचे प्राण वाचले आहे.
भगवान वाल्मिक मोरे (रा. बिबखेडा, ता. कन्नड) असे वाहुन जात असलेल्या शेतकरी तरुणाचे नाव आहे. हल्ली मुक्काम हिवरखेडा नांदगीरवाडी हे शेतकरी एकनाथ मगर यांच्या शेतावर कामाला असून राहण्यास गावा लगत आसलेल्या झोपडपट्टी वस्तीवर आहे. हिवरखेडा नां. व झोपडपट्टी यामध्ये असलेल्या नाल्यावर एक पूल आहे. या परिसरात सर्वत्र सकाळ पासून पाऊस सुरू आसल्याने नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. भगवान मोरे हे गावात किराणा समान घेण्यासाठी आले होते. ते परत आपल्या झोपडपट्टी वस्तीवर जाण्यासाठी निघाले यावेळी या परिसरात वरील भागात जोरदार पाऊस झाल्याने नाल्यास पूर येवून पुलावरून पाणी जात होते.
गावातील ग्रामस्थांनी त्यांना पुलावरून पाणी सुरू असून पलीकडे जाऊ नका असा सल्ला दिला. मात्र पाण्याचा अंदाज न घेता मोरे दुचाकीवरून पूल ओलांडत असताना पाण्याच्या ओघात घसरून वाहू लागले. बघता बघता पुलावरुन दुचाकीसह नाल्यातील पाण्याच्या मुख्य प्रवाहात वाहू लागले. लोकांनी आरडाओरडा सुरू केला मोरे दोनशे फूट अंतर वाहत गेले. वाहत असताना ऐनवेळी नाल्याच्या कडेला आसलेल्या झाडाची फांदी हाताला लागली अन ग्रामस्थांनी वेळीच धाव घेऊन पाण्याच्या कडेला येताच त्यांना वर काढून घेतले यामुळे त्यांचे प्राण वाचले नसता मोठी दुर्घटना घडली असती.