महामार्गावर चाकूहल्ला; ट्रकचालकास लुटले pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : महामार्गावर चाकूहल्ला; ट्रकचालकास लुटले

महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

गंगापूर : छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील भेंडाळा फाटा परिसरात भरदुपारी अज्ञात तिघांनी ट्रकचालकावर चाकूहल्ला करून रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.26) दुपारी सुमारे 3 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ट्रक क्रमांक (केए-56-1648) चे चालक देवेंद्र बागी (वय 54, रा. हुमनाबाद, जि. बिदर, कर्नाटक) हे पुण्याहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. भेंडाळा फाटा परिसरातील एका ढाब्याजवळ त्यांनी ट्रक उभा करून विश्रांती घेतली असता, दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी ट्रकच्या केबिनमध्ये प्रवेश करून त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला.

बागी यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, एका चोरट्याने त्यांच्या कानावर चाकूने वार केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या खिशातील सुमारे 7 हजार रुपये रोख रक्कम लुटली व ट्रकची समोरील काच फोडून तेथून पळ काढला.

जखमी अवस्थेतच देवेंद्र बागी यांनी ट्रक चालवत ढोरेगावच्या दिशेने धाव घेत मदतीसाठी आरडाओरडा केला. ढोरेगाव येथील अल्ताफ शेख, विशाल जोशी, शाहेद शेख व शौकत पटेल यांनी तातडीने धाव घेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.

प्राथमिक उपचारांनंतर रुग्णवाहिका चालक अनिकेत मुळक व लकी शहा यांच्या मदतीने त्यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT