Sant Eknath Sugar Factory : संत एकनाथ साखर कारखान्यावरील प्रशासक नियुक्तीला हायकोर्टाची स्थगिती file photo
छत्रपती संभाजीनगर

Sant Eknath Sugar Factory : संत एकनाथ साखर कारखान्यावरील प्रशासक नियुक्तीला हायकोर्टाची स्थगिती

खंडपीठाने प्रतिवादीना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला.

पुढारी वृत्तसेवा

High Court stays appointment of administrator for Sant Eknath Sugar Factory

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : संत एकनाथ साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमणुकीच्या विभागीय सहनिबंधक (साखर) यांच्या आदेशास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांनी बुधवारी अंतरिम स्थगिती दिली. खंडपीठाने प्रतिवादीना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला. या याचिकांवर १५ डिसेंबर २०२६ ला पुढील सुनावणी होणार आहे.

अनुराधा तुपकरे व इतर १३ संचालकांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, विशेष लेखा परीक्षकांच्या अहवालावरून विभागीय सहनिबंधकांनी संचालक मंडळ बरखास्तीबाबत २३ मार्च २०२६ रोजी नोटीस बजावून खुलासा मागविला होता. सचिन घायाळ शुगर प्रा. लि. या कंपनीने सदर कारखाना चालविण्यास घेतला आहे. त्यासाठी बुलढाणा अर्बन सह. क्रेडिट सोसायटीकडून जे कर्ज घेतले, त्याची परतफेड मुदतीत न केल्यामुळे सदर कारखान्यास नुकसानीची शक्यता आहे. तसेच ऊसउत्पादक शेतकऱ्यांना उसाचा निर्धारित दर दिला नाही, लेखा परीक्षणातील त्रुटींबाबत सुधारात्मक उपाययोजना केल्या नाहीत, असे आक्षेप घेण्यात आले होते.

याचिकाकर्त्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ दिलीप पाटील बनकर यांनी युक्तिवाद केला की, कारखान्याच्या नुकसानीची शक्यता काल्पनिक आहे. मागील वर्षी उसाला निर्धारित दर दिलेला आहे. लेखा परीक्षण अहवाल कारखान्यास सादर केलेलाच नसल्यामुळे सुधारात्मक उपाययोजनांचा प्रश्नच अप्रस्तुत आहे, आदी मुद्दे त्यांनी मांडले. सुनावणीअंती या सर्व मुद्द्यांवर सविस्तर सुनावणी घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत, खंडपीठाने वरीलप्रमाणे अंतरिम आदेश दिला.

अॅड. बनकर पाटील यांना अॅड. स्वप्नील जोशी, अभिषेक पाटील आणि ओंकार शेंडकर यांनी सहकार्य केले. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी काम पाहिले. शेतकऱ्यांच्या वतीने अॅड. अभिजीत कुलकर्णी यांनी स्वतंत्र याचिका दाखल केली होती. 'सध्या ऊस गाळपाचा हंगाम' सुरू असताना कारखान्यावर प्रशासक नियुक्ती अप्रस्तुत असल्याचे नमूद करीत खंडपीठाने या याचिकेतही अंतरिम स्थगिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT