Abhijit Dipke on High Court Clerk Exam Issue : हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक गोंधळ झाल्याचा आरोप करत परीक्षार्थींनी आज (दि. १६ ऑगस्ट) संभाजीनगर येथे आक्रमक पवित्रा घेतला. या ठिय्या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके सहभागी झाले आहेत. "जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलनस्थळावरून हलणार नाही, आता हेच आपलं जंतर-मंतर!" असा निर्धार अभिजीत दीपके यांनी व्यक्त केला आहे.
परीक्षार्थींनी सांगितले की, हायकोर्टाची लिपिक परीक्षा ऑनलाईन होती. परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षेदरम्यान अचानक सर्व्हर ठप्प झाले. अनेक संगणकांचे कीबोर्ड आणि माऊस योग्य प्रकारे काम करत नव्हते. परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत सर्व यंत्रणा कोलमडली. "जर योग्य ऑनलाईन परीक्षा घेता येत नव्हती, तर आधीच सर्व तयारी का केली नाही?" असा थेट सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
आंदोलनाला पाठिंबा देताना अभिजीत दीपके म्हणाले, "तुम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असाल तर मी शेवटपर्यंत तुमच्यासोबत असेन." प्रशासकीय भोंगळ कारभारामुळे ही वेळ आल्याचे सांगत, "यात विद्यार्थी नापास झाले नसून सरकार नापास झाले आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्याची पात्रता नसेल तर कशाला परीक्षा घेता?" असा संतप्त सवालही त्यांनी विचारला.
परीक्षा केंद्रांवरील या भोंगळ कारभारामुळे नैराश्यात आलेल्या परीक्षार्थींचा तीव्र आक्रोश पाहायला मिळाला. "आता आमच्यावर जीवन संपवण्याची वेळ आली आहे," अशा अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून जिल्हा न्यायाधीशांनी स्वतः उपस्थित राहून फेरपरीक्षेचे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी यावेळी दीपके यांनी केली.
लिपिक पदाची परीक्षा तात्काळ रद्द करून ती पुन्हा नव्याने घेण्यात यावी, या मागणीवर परीक्षार्थी ठाम आहेत. फेरपरीक्षेचा निर्णय होत नाही आणि या प्रकरणाची तातडीने चौकशी केली जात नाही, तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन असेच सुरू राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांसह अभिजीत दीपके यांनी दिला आहे.