Helmet Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Helmet Rule : शहरवासीयांच्या मानगुटीवर पुन्हा हेल्मेटचे भूत

शासकीय कार्यालयांपासून सुरुवात; महिनाभरानंतर कारवाईचा बडगा, पोलिस आयुक्तांचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरात आणि जिल्ह्यात दुचाकी अपघातात होणारे मृत्यू रोखण्यासाठी पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आता कंबर कसली आहे. वाढते प्राणांतिक अपघात कमी करण्यासाठी हेल्मेटचा वापर करण्यावर भर दिला जात असून, सुरुवातीला शासकीय कार्यालयांत दुचाकीवरून येणाऱ्यांसाठी हेल्मेट बंधनकारक करण्यात येणार आहे. महिनाभर शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार असून, त्यानंतर कारवाईचे संकेत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले आहेत.

पोलिस आयुक्तालयात बुधवारी (दि. १७) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरटीओ विजय काठोळे, उपायुक्त शर्मिष्ठा घारगे वालावलकर, सहायक आयुक्त सुभाष भुजंग आदी उपस्थित होते. पोलिस आयुक्त म्हणाले की, राज्यातील अपघातांची वाढती आकडेवारी पाहता अपघाताचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी सर्वतोपरी उपायोजना राबविण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन महिन्यांपासून काम सुरू आहे. पहिल्या टप्यात प्राणांतिक अपघात १० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी (दि.१६) पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली रस्ता वाहतुक सुरक्षेसंदर्भाने बैठक पार पडली.

या बैठकीला महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आरटीओ व इतर संबंधीत विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट व अपघात रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यावर सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हा नियोजन समितीतील १ टक्के निधी वाहतूक व्यवस्थेसाठी आरक्षित करण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली.

वाहनचोरी रोखण्यासाठी कागदपत्रे तपासणार

शहरात ३० टक्के गुन्हे हे वाहनचोरीचे आहेत. दरवर्षी ८०० ते एक हजार गाहचा चोरीला जातात. या चोरीच्या गाड्या शेजारच्या जिल्ह्यांमध्ये स्वस्तात विकल्या जातात. 'कागदपत्रे नंतर देऊ' असे सांगून अनेक जण या गाडधा खरेदीही करतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवून वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करणार आहेत. कागदपत्रे नसल्यास वाहन जप्त केले जाईल. नागरिकांनी आपली कागदपत्रे सोबत ठेवावीत किंवा 'डीजी लॉकर' मध्ये अपडेट ठेवावीत, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.

रस्त्यावर खड्ड्यांचे काय ?

रस्त्यातील खड़े, अतिक्रमणे, विजेचे खांब, साईंड पंखे न भरल्यानेही अनेक अपघात घडून निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. यावर अगोदर उपाययोजना करणे गरजेचे आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर पोलिस आयुक्तांनी सांगितले की, या बाबींवरही बैठकीत चर्चा झाली असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित विभाग त्यावर कारवाई करणार आहे.

अपघातांची आकडेवारी

  • जिल्हातील बळी: २०२५ मध्ये जिल्ह्यात ७०१ अपघाती मृत्यूंची नोंद झाली. २०२४ च्या तुलनेत हा आकडा ८ टक्क्यांनी वाढला आहे.

  • यंदाचे चित्रः २०२६ मध्ये जानेवारी ते मे या अवघ्या पाच महिन्यांत जिल्ह्यात २४४ जणांना जीव गमवावा लागला आहे.

  • शहरातील स्थितीः शहरातही अपघातांचे प्रमाण वाढले असून, २०२५ मध्ये १७० जणांचा बळी गेला.

  • तरुणाईचा बळी: अपघाती मृतांमध्ये सुमारे ६० टक्के प्रमाण हे दुचाकीस्वारांचे असून, त्यात १८ ते ४१ वयोगटातील मृतांची संख्या सर्वाधिक आहे.

लाखमोलाचा जीव वाचविण्यासाठी हेल्मेट वापरा- घरातील कर्ता तरुण गेल्यावर कुटुंबापुढे जे संकट उभे राहते, ते कशानेही मरून निघत नाही. त्यामुळेच लाखमोलाचा जीव वाचवण्यासाठी सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा. मोहिमेची सुरुवात आम्ही पोलिसांपासूनच करत आहोत. सर्व अधिकारी, अंमलदारांना हेल्मेट सक्तीचे केले आहे. त्यानंतर सर्व शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था आणि रुग्णालयांनीही आपापल्या कर्मचाऱ्यांना याबाबत आदेश द्यावेत. हळूहळू नागरिकांना महत्त्व पटवून दिल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT