अतिवृष्टीमुळे ऐन नवरात्रोत्सवात बाजारपेठेला फटका  File Photo
छत्रपती संभाजीनगर

अतिवृष्टीमुळे ऐन नवरात्रोत्सवात बाजारपेठेला फटका

रोजची उलाढाल ४० टक्क्यांनी घटली, व्यापारीवर्ग हवालदिल : पाऊस थांबण्यासाठी धावा

पुढारी वृत्तसेवा

Heavy rains hit markets during Navratri festival

राहुल जांगडे

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीमुळे शहरातील बाजारपेठेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. ऐन नवरात्रोत्सवात रोजची उलाढाल तब्बल ४० टक्क्यांनी घटल्याने लहान-मोठे सर्वच व्यापारी हवालदिल झाले आहेत. जीएसटी कपातीमुळे मार्केटला उठाव येईल, या आशेवर स्टॉक केलेला लाखोंचा माल तसाच पडल्याने व्यापारीवर्गही पावसाने ब्रेक घ्यावा, असा धावा करत आहे.

दरवर्षी दसरा-दिवाळीत बाजारपेठेची उलाढाल कोट्यावधींनी वाढते. वर्षभरातील ५० टक्के व्यवसाय या सणासुदीच्या दिवसातच होत असतो. त्यामुळे अगदी लहान-मोठ्या वस्तूंपासून ते किराणा, कपडा, इलेक्ट्रॉनिक्स आणि सराफा मार्केटला दसरा दिवाळीची प्रतिक्षा लागलेली असते. त्यात यंदा जीएसटी कपातीमुळे नवरात्रत्सवात अधिक चांगला व्यवसाय होईल, या आशेने नव्हे तर मोठ्या विश्वासाने व्यावसायिकांनी कोट्यावर्षीचा नवा स्टॉक भरुन ठेवला. नवरात्रच्या पहिल्या माळेला म्हणजेच २२ सप्टेंबरपासून जीएसटी कपातीचा निर्णयही लागू झाल्याने ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दोन दिवस बाजारपेठात चैतन्य, उत्साहाची रेलचेल सुरू होती.

मात्र, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाजारपेठेच्या उत्साहावर पाणी फेरल्याचे चित्र आहे. लगतच्या गावातून येणाऱ्या ग्राहकांची संख्या रोडावली आहे. पावसामुळे शहरातील अनेक ग्राहकांनी खरेदीचा बेत पुढे ढकल्याने रोजची उलाढाल ३० ते ४० टक्यांनी घसरली आहे. यामुळे वाहन मार्केट वगळता बाजारात तुरळक गर्दी आणि दुकानदार ग्राहकांच्या प्रतिक्षेत बसल्याचे चित्र आहे.

उलाढाल मंदावली दरवर्षी नवरात्रोत्सवात बाजारपेठेला उठाव मिळून कोट्यावधीची उलाढाल होत असते. मात्र यंदा अतिवृष्टीचा बाजारपेठेला मोठा फटका बसत असून रोजची उलाढाल ३० ते ४० टक्क्यांनी घटली आहे. व्यापारी आता पाऊस उघडण्याची वाट बघत आहे.
-लक्ष्मीनारायण राठी, वरिष्ठ उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ
ग्रामीण भागातील ग्राहकांची पाठ खरेदीला येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असते. यंदा मात्र, अतिवृष्टीमुळे हा व्यवसाय घटला आहे. सणासुदीत चांगल्या व्यवसायाच्या आशेने भरलेला लाखोचा माल ग्राहकांच्या प्रतिक्षेत पडून आहे.
-धनराज मेधावाले, कपडा व्यापारी, टिळकपथ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT