Heavy rains cause untold losses to farmers
कन्नड, पुढारी वृत्तसेवा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, दसऱ्यासारख्या सणावर विरजण पडले आहे. अतिवृष्टीमुळे तोंडावर आलेली पीकं मातीमोल झाले असून, शेतकऱ्यांची दिवाळी देखील अंधारात जाण्याची शक्यता आहे. नुकसानभरपाई मिळाली तरच शेतकरी दिवाळी साजरी करू शकणार असून अतिवृष्टीमुळे दसऱ्यालाच शेतकऱ्याच दिवाळं निघालं आहे.
तालुक्यात यंदा मे उन्हाळ्याच्या महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. यामुळे खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. तरीही, अवकाळी संकटाशी दोन हात करत बळीराजाने पावसाच्या उघडझापीत कशीबशी शेती तयार करून पेरण्या केल्या.
ऐन सोंगणीच्या तोंडावर आलेली मका, कापूस, तूर, बाजरी, भाजीपाला, फळबागा आदी पीकं अतिवृष्टीमुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. परिणामी, शेतकरी अस्मानी संकटासमोर हतबल झाला आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात मका सोंगणीस येतो, आणि त्यावरच शेतकरी दसरा आणि दिवाळी साजरी करतात. पण यंदा पिकांसह जमिनीवरील मातीही वाहून गेली असून, अनेक विहिरी खचल्याने शेतकऱ्यांनी केलेला सारा खर्च वाया गेला आहे.
या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर शेतीच्या पुनर्वसनाचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. दसऱ्याच्या सणावर विरजण पडलेलं असतानाच, आता दिवाळी तरी साजरी करता येईल का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
तत्काल मदत शेतकऱ्यांना द्या आता थेट सरकारने सरसगट मदत तत्काळ शेतकऱ्यांना दिली पाहिजे. ऐन दसरा दिवाळी सणात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून देशाची चक्रे फिरवणारा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देऊ नका.कृषिभूषण स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेश कमिटी सदस्य