छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे थैमान सुरूच असून नदीकाठावरील अनेक गावांना पूर आला आहे. पुरामुळे परभणी, हिंगोली, जालना, नांदेड, धाराशिव जिल्ह्यांतील काही गावांचा संपर्क तुटला आहे. विभागातील 420 महसूल मंडलांपैकी 284 मंडलांत अतिवृष्टी झाली असून सात मंडलांत ढगफुटीसद़ृश पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत चारजणांचा बळी गेला आहे.
शनिवारी रात्री नांदेड, हिंगोली, परभणीत बरसणार्या पावसाने रविवारी रात्रीपासून उर्वरित मराठवाडा व्यापला. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी पावसाची रिमझिम सुरूच होती. त्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अजिंठा लेणीतील सुप्रसिद्ध सप्तकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. सिल्लोड तालुक्यातीला लघू आणि मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. जायकवाडी धरणात 87.76 टक्के पाणीसाठा झाला आहे. कालव्याद्वारे पाणी सोडल्यामुळे बीड, जालन्यातील गोदावरीला पूर आहे. धरणातील पाणी पैठणच्या गोदापात्रात सोडण्याची शक्यता आहे.
परभणी जिल्ह्यातील लोअर दुधना या मोठ्या प्रकल्पात या 24 तासांतच पाण्यात मोठी वाढ होऊन तो 70.85 टक्के भरला. यामुळे पाटबंधारे विभागाने सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता या प्रकल्पातून 6,528 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडला आहे. त्यामुळे दुधना नदीला पूर आला आहे. याशिवाय मासोळी मध्यम प्रकल्प, मुदगलसह सर्वच बंधार्यांत मोठा पाणीसाठा झाला. परिणामी या बंधार्यांतून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने सर्वच छोट्या-मोठ्या नद्यांना पूर आला आहे. घनसावंगी, पाचोड, देवणी, रेवाळी, इटकूर, अर्धापूर, पाथरी, बसंबा येथे ढगफुटीसारखा पाऊस झाला.
तिसर्या दिवशीही पावसाचा कहर पाहावयास मिळाला. वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला, तर जिल्ह्यात विविध ठिकाणच्या 54 जणांना पुराच्या पाण्यातून काढण्यात प्रशासनाला यश आले. टेंभुर्णी येथील सुभाष बाबुराव सवंडकर हा 38 वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला. वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांनी किन्होळा, कुरुंदा परिसरात भेट देऊन 400 कुटुंबीयांच्या स्थलांतराची तयारी सुरू केली. औंढा नागनाथ पोलिस ठाण्याच्या बिनतारी संदेश यंत्रणेच्या टॉवरवर वीज पडल्याने टॉवरचे नुकसान झाले.
जिल्ह्यात सोमवारी 45 महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये तब्बल 25 महसूल मंडलांत एकाच दिवशी 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती उद्भवली आहे. इतर जिल्ह्यांतील धरणांतून होणार्या विसर्गावरही प्रशासकीय यंत्रणा समन्वय ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. नांदेड जिल्ह्यात इतर जिल्ह्यांतील धरणांतील पाण्याचा विसर्ग येत असल्याने पूरस्थिती गंभीर झाली आहे. तीन दिवसांत 25 जनावरांचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला.
बीड ः जिल्ह्यातील 61 मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली असून, यापैकी 35 मंडलांत 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. यामुळे नदी, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. बीडसाठी महत्त्वाच्या असलेल्या मांजरा व माजलगाव धरणांतील पाणी पातळीदेखील झपाट्याने वाढू लागली आहे. बिंदुसरा नदीला पूर आल्याने प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मांजरा नदीही दुथडी भरून वाहत आहे.
लातूर : लातूर जिल्ह्यात पावसाने कहर केला असून, तब्बल 32 महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. सोमवारी (दि. 2) सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 68.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बैल धुण्यासाठी गेलेला जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी येथील एका युवकाचा मृतदेह सापडला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा दूरद़ृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. लातूर जिल्ह्यात संततधार सुरू असून, सोमवारी सूर्यदर्शन झाले नाही. पिके पाण्याखाली गेली आहेत. चाकूर उदगीर व रेणापूर तालुक्यातील सर्वच महसूल मंडले अतिवृष्टीने व्यापली आहेत.
जिल्ह्यात 48 तासांत दमदार पाऊस झाला असून, कळंब, वाशी आणि धाराशिव तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. तेरणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.
कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव येथील आखाड्यावर एक चार दिवसांचे बालक व मातेसह इतर काहीजण पुरात अडकले होते. ही घटना कळताच पहाटे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे हिंगोली येथून नगरपालिकेचे आपत्ती व्यावस्थापन बचाव कार्याचे पथक सोबत घेऊन डोंगरगाव येथे दाखल झाले. या पथकाने सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. त्यात चार दिवसांच्या बालकाचाही समावेश होता.
मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा यवतमाळ येथील पूलही पाण्याखाली गेला आहे. त्याचा परिणाम या मार्गावरील वाहतुकीवर झाला आहे. पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही धोकायदायक प्रवास करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.