Health Department recruitment process cancelled
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: राज्य शासनाच्या नव्या धोरणानुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (एनयूएचएम), १५ वा वित्त आयोग आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आदी योजनाअंतर्गत सुरू असलेल्या सर्व भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. यापुढे या योजनांसाठी आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती थेट भरतीऐवजी बाह्य यंत्रणेमार्फत सेवा कंत्राट (आउटसोर्सिंग) पद्धतीने करण्यात येणार असल्याचे शुक्रवारी (दि.७) महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
महापालिकेने आरोग्य विभागातील नियुक्त्या आता सेवा कंत्राटातून केल्या जाणार असल्याचे जाहीर केले आहे. आयुक्त, शहरी आरोग्य, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांनी ७ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या पत्रानुसार हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
त्यानुसार नागरी आरोग्य संस्थांमधील मनुष्यबळ ठोक मानधन तत्त्वावर सेवा कंत्राटाद्वारे उपलब्ध करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या संबंधित भरती जाहिराती रद्द समजाव्यात, असे स्पष्ट केले आहे. तसेच या भरती प्रक्रियेतून कोणतीही पुढील नियुक्ती केली जाणार नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे अर्ज दाखल केलेल्या व नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, शासनाच्या नव्या धोरणामुळे आरोग्य विभागातील रिक्त पदांची गरज आता थेट भरतीद्वारे नव्हे, तर सेवा कंत्राटाच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे.
संबंधित योजनांसाठी आवश्यक मनुष्यबळ बाह्य यंत्रणेमार्फत उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्यानुसार पुढील नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.