Crime News : दुचाकी चोरीला गेल्याने 'तो' बनला सराईत चोर File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : दुचाकी चोरीला गेल्याने 'तो' बनला सराईत चोर

एमआयडीसी सिडको पोलिसांनी चोरट्याकडून जप्त केल्या १५ दुचाकी

पुढारी वृत्तसेवा

He became a burglar after his bike was stolen

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

चार वर्षांपूर्वी स्वतःची दुचाकी चोरीला गेल्यानंतर पत्नी काय म्हणेल या धास्तीपोटी पहिल्यांदा दुसऱ्याची दुचाकी चोरली. त्यानंतर त्याला दुचाकी चोरीची सवय लागल्याने तो सराईत गुन्हेगार बनला. एमआयडीसी सिडको पोलिसांनी त्याला अखेर बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून चोरीच्या १५ दुचाकी हस्तगत केल्या. शेख फारूक शेख इस्माईल ४८, रा. अजीज कॉलनी, नारेगाव) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी बुधवारी (दि. २१) दिली.

एमआयडीसी सिडको पोलिसांचे विशेष पथकाला सोमवारी (दि.१९) एक इसम सिपेट कॉलेजसमोर संशयास्पद दुचाकीसह उभा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शेख फारुकला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत विचारपूस केली असता, त्याने ती प्रोझोन मॉल परिसरातून चोरल्याची कबुली दिली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने शहरात विविध ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींना चोरीच्या दुचाकी बनावट क्रमांक टाकून विकल्याचे सांगितले.

त्याने प्रोझोन मॉल, एमजीएम हॉस्पिटल आणि जिल्हा न्यायालय परिसरातून आतापर्यंत १० ते १५ दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून, त्याने लपवून ठेवलेल्या आणि विक्री केलेल्या ८ १० बाईक, चार मोपेड अशा एकूण १५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे एमआयडीसी सिडको, सिडको, वेदांतनगर, उस्मानपुरा आणि मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील १५ गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक भरत पाचोळे, उपनिरीक्षक संजू काळे, संतोष सोनवणे, संजय नंद, प्रकाश सोनवणे, संतोष गायकवाड, परशुराम सोनुने, अरविंद पुरी आणि रतन नागलोत यांच्या पथकाने केली. आरोपीला २३ जानेव ारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

बेरोजगार झाला, दागिने गहाण ठेवले

आरोपी फारूक हा ठेकेदार असलेल्या चुलत्याकडे काम करत होता. २०२२ मध्ये चुलत्याच्या निधनानंतर तो बेरोजगार झाला. त्यातच दुचाकी चोरीला गेली. पत्नीचे दागिने गहाण ठेवले होते. बहिणीच्या एका मॅटरमध्ये सर्व जमापुंजी लावली. त्यामुळे तो तणावात आला. उपचार सुरू झाले. त्यातच त्याने दुचाकी चोरीचा धडका लावला.

टापटीप कपडे, उच्च राहणीमान

इयत्ता दहावीपर्यंत शिकलेल्या फारूकला पत्नी, तीन मुले आहेत. पत्नी एका हॉस्पिटलमध्ये काम करते. त्यालाही महिन्यापूर्वी तिने तिथेच कामाला लावले होते. मात्र, हा इकडे दुचाकी चोरीचा धंदा काही सोडत नव्हता. टापटीप कपडे, उच्च रहाणीमान असल्याने तो दुचाकी चोरताना कोणाला संशयही येत नव्हता.

७ ते ८ हजारांत विक्री

रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकीला चावी लावून दाबून फिरवायचा. लॉक निघाले की लगेच दुचाकी लंपास करायचा. कागदपत्रे नंतर देण्याची थाप मारून मजूर, मिस्तरी काम करणाऱ्यांना अवघ्या ७ ते ८ हजारांत दुचाकी विक्री करायचा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT