Hang the person who committed unnatural torture on a three-year-old child
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तीन वर्षांच्या चिमुरडीवर शाळेच्या आवारात अनैसर्गिक अत्याचार करणारा आरोपी विजय हरिदास जीवनवाल याच्याविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत नागरिकांनी शनिवारी (दि.१८) पोलिस आयुक्तालयासमोर आंदोलन केले. तसेच संबंधित शाळेतील शिक्षक, शिक्षिका व संचालक हेही जबाबदार असून त्याच्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनावेळी लक्ष्मण सोन-वणे, माजी नगरसेवक मनोज गांगवे, संजय बन्सवाल, सुनितर बरथुने, मधुकर जातोडे, हरेश गांगवे, संतोष जाटवे आदी उपस्थित होते. अधिक माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी बालिकेने घरी आईसमोर आपल्यासोबत झालेल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
तक्रारदार महिलेची तीन वर्षांची मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा दोघेही एकाच शाळेत शिकतात. शाळा सुटल्यानंतर पालक पोहोचण्याआधीच विजय जीवनवाल ही मुलगी खेळण्याच्या कारणावरून घरी घेऊन जात असे, आणि त्याच दरम्यान त्याने घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र, शाळा परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष कसे झाले, बाहेरील व्यक्तींना मुलांशी असा संपर्क कसा मिळाला, असा सवाल संतप्त आंदोलनादरम्यान उपस्थित केला. समाजबांधवांनी या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी नागरिकांनी पोलिस आयुक्तालयासमोर जोरदार निदर्शने केली. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.