Crime News : विश्वासाने चावी दिली, दागिने गायब (Pudhari File Photo)
छत्रपती संभाजीनगर

Crime News : विश्वासाने चावी दिली, दागिने गायब

मित्राच्या मुलावर दागिने चोरीचा संशय; एन-२ येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Handed over the key in good faith; jewelry missing

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घराची चावी विश्वासाने मित्राच्या मुलाकडे देऊन गावी गेलेल्या सेवानिवृत्त व्यक्तीच्या घरातून सव्वा नऊ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना सिडको एन-२ येथील जिजामाता कॉलनीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नागनाथ नारायण आवाळे (वय ६४) हे १ मार्च २०२५ रोजी पत्नीसह लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे गेले होते. घर रिकामे राहणार असल्याने त्यांनी मित्राच्या मुलाकडे घराची चावी सोपविली होती. परत आल्यानंतर घरातील सर्व सामान व्यवस्थित दिसल्याने कपाटाची तपासणी करण्यात आली नव्हती. १० जून रोजी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त दागिने

काढण्यासाठी कपाट उघडले असता दागिन्यांचा डबा गायब असल्याचे निदर्शनास आले. घरात शोधाशोध करूनही दागिने न सापडल्याने संशय मित्राच्या मुलावर गेला. संबंधित युवकाचे आयुष्य बिघडू नये या हेतूने सुरुवातीला पोलिसांत गुन्हा दाखल न करता तक्रार अर्ज देण्यात आला होता. तसेच त्याच्या पालकांकडे दागिने परत करण्याची विनंतीही करण्यात आली.

मात्र प्रतिसाद न मिळाल्याने अखेर मुकुंदवाडी पोलिसांत फिर्याद देण्यात आली. चोरीस गेलेला ऐवज : साडेपाच तोळ्यांचे गंठण, दीड तोळ्याचे मंगळसूत्र, एक तोळ्याचे झुमके, पाच ग्रॅमच्या कानातील वेली आणि साडेआठ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा सुमारे सव्वा नऊ तोळे सोन्याचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुकुंदवाडी पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT