Grishneshwar Temple : एक नोव्हेंबरपासून घृष्णेश्वर मंदिर सहा महिने राहणार बंद file photo
छत्रपती संभाजीनगर

Grishneshwar Temple : एक नोव्हेंबरपासून घृष्णेश्वर मंदिर सहा महिने राहणार बंद

भुयारी मार्गाच्या कामाला आजपासून सुरुवात; मंदिर परिसरातील वाहतूक राहणार बंद

पुढारी वृत्तसेवा

Grishneshwar Temple to remain closed for six months starting November 1st

वेरूळ, पुढारी वृत्तसेवा : जगप्रसिद्ध वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातील भुयारी मार्गाच्या कामाला गुरुवार, दि. १ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या कामामुळे मंदिर परिसरातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून, त्यानंतर १ नोव्हेंबरपासून मंदिर परिसरातील अंतर्गत कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या कामाच्या कालावधीत भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घृष्णेश्वर मंदिर तब्बल सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती बुधवारी (दि. ३०) वेरूळ येथे झालेल्या ग्रामस्थ व प्रशासनाच्या बैठकीत देण्यात आली.

भुयारी मार्गाच्या कामाला गुरुवारपासून सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे. काम सुरू असताना मंदिर परिसरातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. भाविक, पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात येत असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीस मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष कुणाल दांडगे, उप विभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी संतोष गोरड तहसीलदार संतोष गुट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, पोलिस निरीक्षक राजू तडवी, विशाल बोडखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिलीप कोलते, वेरूळचे पोलिस पाटील रमेश ढिवर यांच्यासह ग्रामस्थ व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मंदिरात अंतर्गत तीन वेळेस आरती, पूजा होणार असल्याची माहिती घृष्णेश्वर मंदिर ट्रस्ट अध्यक्ष कुणाल दांडगे यांनी दिली.

मंदिर परिसरातील अंतर्गत कामे १ नोव्हेंबरपासून मंदिर परिसरातील अंतर्गत कामाला सुरुवात होण्याची शक्यता असून, या काळात मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. हे काम सुमारे सहा महिने या चालण्याची शक्यता असल्याने कालावधीत भाविकांना घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येणार नाही.

जड-अवजड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

वेरुळ-खुलताबाद-दौलताबाद-छत्रपती संभाजीनगर दिशेने जाणारी जड-अवजड वाहने छत्रपती संभाजीनगर-शरणापूर फाटा-माळीवाडा-वरसडी-कसाबखेडा फाटा मार्गे कन्नडकडे वळविण्यात येणार आहेत.

फुलंब्री-खुलताबाद-वेरुळ-कन्नड दिशेने जाणारी जड-अवजड वाहने फुलंब्री-छत्रपती संभाजीनगर-शरणापूर फाटा-माळीवाडा-वरसडी-कसाबखेडा फाटा-वेरुळ या पर्यायी मार्गाने कन्नड व चाळीसगावकडे वळविण्यात येणार आहेत.

तसेच कन्नड-चाळीसगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणारी जड-अवजड वाहतूक कन्नड-वेरूळ-कसाबखेडा फाटा-वरसडी-माळीवाडा-शरणापू फाटा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे वळविण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT