छत्रपती संभाजीनगर : पदवीधर मतदारसंघासाठी प्रारूप मतदारयादी बुधवारी (दि.३) प्रसिध्द करण्यात आली. त्यानुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत एकूण २ लाख ४० हजार ५४९ मतदारांनी नावनोंदणी केली आहे. यामध्ये १ लाख ८८ हजार ७७१ पुरुष, ५१ हजार ७६३ महिला आणि १५ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र पापळकर, अपर आयुक्त सामान्य प्रशासन तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी मंजूषा मिसकर यांच्यासह तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक डिसेंबर २०२६ मध्ये होणार आहे. त्यासाठी मागील दोन महिन्यांपासून मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू होती. आता बुधवारी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ४६ हजार ४०६ पुरुष, १५ हजार ९०८ महिला व ४ तृतीयपंथी असे एकूण ६२ हजार ३१८ मतदार आहेत. जालना जिल्ह्यात एकूण २३ हजार ६४८ पुरुष, ५ हजार २७२ महिला, तर २ तृतीयपंथी असे एकूण २८ हजार ९२२ मतदार आहेत. परभणी जिल्ह्यात १६ हजार ६३५ पुरुष, ४ हजार ६४ महिला, तर १ तृतीयपंथी असे एकूण २० हजार ७०० मतदार आहेत. हिंगोली जिल्ह्यात ६ हजार ४७६ पुरुष, १ हजार ५२८ महिला असे एकूण ६ हजार ४ मतदार आहेत. नांदेड जिल्ह्यात २३ हजार ८६७ पुरुष, ६ हजार २६४ महिला, तर ४ तृतीयपंथी असे एकूण ३० हजार १३५ मतदार आहेत.
लातूर जिल्ह्यात १७ हजार ४९२ पुरुष, ४ हजार ९९३ महिला, तर २ तृतीयपंथी असे एकूण २२ हजार ४८७मतदार आहे. धाराशिव जिल्ह्यात १६ हजार ७६२ पुरुष, ४ हजार ४७ महिला असे एकूण २० हजार ८०९ मतदार आहेत.
बीड जिल्ह्यात ३४ हजार ४८५ पुरुष, ९ हजार ६८७ महिला, तर २ तृतीयपंथी असे एकूण ४७ हजार १७४ मतदार आहेत. विभागातील आठही जिल्ह्यांत एकूण १ लाख ८८ हजार ७७१ पुरुष, ५१ हजार ७६३ महिला, तर १५ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ४० हजार ५४९ मतदार आहेत.
अंतिम मतदार यादी
पुढील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजेच दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी हा ०३ डिसेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ असा निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये प्राप्त झालेल्या सर्व दावे व हरकती ५ जानेवारी २०२६ पूर्वी निकाली काढण्यात येणार आहेत. अंतिम मतदार यादी १२ जानेवारी २०२६ रोजी केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली