वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी लवकरच जीआर व निधी file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी लवकरच जीआर व निधी

उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

GR and funds soon for Newspaper Vendor Welfare Board

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वृत्तपत्र विक्रेता स्वातंत्र्य कल्याणकारी मंडळाची घोषणा तर आम्ही केली आहे. लवकरच शासन निर्णय व निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, तसेच समिती स्थापन करून वृत्तपत्र विक्रेत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विमानतळावर दिले.

राज्यातील हजारो वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा आणि मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या वृत्तपत्र विक्रेता स्वातंत्र्य कल्याणकारी मंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, यासाठी संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

याच अनुषंगाने श्रमिक वर्तमानपत्र विक्रेते संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. शिवाजी ढेपले यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची सोमवारी (दि.८) चिकलठाणा विमानतळावर भेट घेत वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या न्याय्य मागण्यांचे निवेदन सादर करून कल्याणकारी मंडळाच्या रखडलेल्या अंमलबजावणीबाबत त्यांचे लक्ष वेधण्यात आले.

यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची अधिकृत नोंदणी, शासकीय ओळखपत्र, आरोग्य विमा, अपघात विमा, पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, वैद्यकीय सुविधा आणि वयोवृद्ध विक्रेत्यांसाठी आर्थिक मदत या सुविधा कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी अध्यक्ष प्रा. ढेपले, ज्येष्ठ सल्लागार प्रकाश वाघ, सचिव विष्णू ढाकणे, कोषाध्यक्ष गोपीनाथ माळी शहर अध्यक्ष किशोर लहाने, मनोज बुन्हाडे, अजिनाथ बांगर, रामकृष्ण राऊत, राजू गायकवाड, दिनकर धनवे, प्रभाकर डेरे, संतोष जटाळे, विठ्ठल पारटकर, नितीन दहाड अशोक खंदारे आदी पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेता बांधव उपस्थित होते.

वृत्तपत्र विक्रेते ऊन, वारा, पाऊस, थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीत पहाटेपासून जनतेपर्यंत वर्तमानपत्र पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या प्रसारमाध्यमांचा दुवा म्हणून काम करणाऱ्या या कष्टकरी घटकाला आजही आरोग्य विमा, अपघात विमा, आर्थिक सुरक्षा, पाल्यांसाठी शैक्षणिक मदत आणि वृद्धापकाळातील आर्थिक आधार अशा सुविधांची प्रतीक्षा आहे.

संघटनेकडून सातत्याने पाठपुरावा

१६ सप्टेंबर २०२३ रोजी संभाजीनगर येथे क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले होते. मुंबई मंत्रालय व सचिवालयात मंत्र्यांना दिवेदन दिले. यामुळे १० ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास मंजुरी मिळाली. मात्र, प्रत्यक्ष शासन निर्णय, निथी आणि अंमलबजावणी अद्याप अपेक्षित असल्याने संघटनेने पुन्हा एकदा शासनाकडे ठाम भूमिका मांडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT