Chhatrapati Sambhajinagar Crime
छत्रपती संभाजीनगर : लेखणी बंद आंदोलन करताना तुम्ही काळी फीत का लावली नाही, या कारणावरून एका वकिलाने सरकारी वकिलाला कक्षात शिरून बुटाने कपाळावर, डोक्यात, खांद्यावर मारहाण केली. गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मंगळवारी (दि.१४) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास जिल्हा व सत्र न्यायालयात घडला.
मनोहर रामदास लोखंडे (रा. कोकणवाडी) असे आरोपी वकिलाचे नाव असून, त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली.
फिर्यादी ॲड. अविनाश सूर्यकांतराव देशपांडे (५९, रा. पैठणगेट) यांच्या तक्रारीनुसार, ते आठ वर्षांपासून जिल्हा सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत. सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास न्यायालयातील सरकारी वकील कार्यालयात कामकाज करत असताना आरोपी वकील मनोहर लोखंडे कक्षात आला त्याने १३ ऑक्टोबरच्या लेखणी बंद आंदोलनात तुम्ही काळी फीत का लावली नाही या कारणावरून पायातील बुटाने त्यांना मारहाण केली. अंगातील कोट ओढून झटापट करून बुक्क्याने पोटावर व इतरत्र मारहाण केली. दोन्ही हाताने देशपांडे यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कार्यालयातील शिपाई वालतुरे यांनी सोडविल्याने देशपांडे बचावले.
आरडाओरड ऐकून कोर्ट पैरवी पोलिस सुनील ढेरे धावत आले. लोखंडेने कक्षातून बाहेर नेताना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून तू बाहेर ये तुला रॉकेल टाकून जिवंत मारून टाकतो, अशी धमकी दिली. शासकीय अडथळा आणला. याप्रकरणी वेदांतनगर कामात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रविणा यादव करत आहेत.
आंदोलनात सहभाग नोंदविला होता
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ७ आणि १३ ऑक्टोबर रोजी वकिलांनी आंदोलन पुकारले होते. यात जिल्हा सरकारी वकील व लोकअभियोक्ता अविनाश देशपांडे व त्यांचे सर्व सहकारी यांनी सहभाग घेऊन निषेध नोंदविला होता. तरीही ॲड. मनोहर लोखंडे याने आकस वृत्तीने व प्रसिद्धीसाठी ॲड. देशपांडे यांच्यावर हल्ला केला. या घटनेचा सर्व सरकारी वकिलांनी निषेध नोंदविला. तसेच, लालफिती लावून न्यायालयीन कामकाज केले, असे प्रभारी जिल्हा सरकारी वकील व लोकअभियोक्ता एस व्ही मुंडवाडकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.