Sambhajinagar Government deceived Maratha community in Gazette
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा हैदराबाद गॅझेटिअरनुसार २ सप्टेंबरच्या जीआरमध्ये मराठा समाजाला तर काहीही लाभ होणार नसून, सरकारने समाजाला फसवल आहे, असा आरोप करत लाभहोणारच असेल गॅझेटिअरनुसार आरक्षण कसे लागू होणार हे सरकारने स्पष्ट करावे. शिंदे समितीपूर्वी व नंतर मिळालेल्या कुणबी नोंदींची श्वेतपत्रिका काढावी. तसेच कुणबी नोंदी नसलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन वैध करून दाखवावे अन्यथा मराठा समाजाची जाहीर माफी मागावी, असा एकमुखी सूर सरकार विर रोधात राज्यस्तरीय मराठा आरक्षण सिंहावलोकन गोलमेज परिषदेत आरक्षण अभ्यासकांचा गुरुवारी (दि.१८) उमटला.
सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत पार पडलेल्या गोलमेज परिषदेसाठी आरक्षणाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ व जाणकार अभ्यासकांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने राजेंद्र कोंढरे, डॉ. राजेंद्र दाते, किशोर चव्हाण, डॉ. संजय लाखे, डॉ. शिवानंद भानुसे, अजिंक्य पाटील, राजेंद्र कुंजीर यांच्यासह मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. परिषदेत आरक्षणावर विविध दावे प्रत्यादावे, शासन आदेशाची अंमलबजावणी आणि प्रमाणपत्र वितरणातील गोंधळ यावर जोरदार चर्चा रंगली. चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. संजय लाखे, डॉ. शिवानंद भानुसे, राजेंद्र कोंढरे आणि यांनी परिषदेतील मुद्द्यांचा सारांश पत्रकारांसमोर मांडला. त्यांनी एकमुखी सूर लावत ठाम सांगितले की, आता केवळ आंदोलन करून नाही, तर कायदेशीर मागनिच मराठा समाजाच्या भवितव्याचा निर्णायक तोडगा निघणार आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत बोलावण्यात आले होते मात्र ते आले नाहीत, असे डॉ. लाखे यांनी सांगितले. या परिषदेला सुनील कोटकर, रमेश केरे, रवींद्र काळे, विजय काकडे, सुनील नागणे, योगेश शेळके, मुकेश सोनवणे, सतीश देशमुख, राजेंद्र गोरे, सुभाष कोळकर, शरद देशमुख, दिनेश फलके, डॉ. रावसाहेब लहाने, डॉ. योगेश बहादुरे, डॉ. परमेश्वर माने, राहुल पाटील, सचिन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. या गोलमेज परिषदेचे सूत्रसंचालन योगेश शेळके धामोरीकर यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. शिवानंद भानुसे यांनी केले. उपस्थितांचे आभार अजिक्य पाटील यांनी मानले. परिषदेत राजेंद्र कोंढरे म्हणाले की, मराठा समाजाला एकाकी पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे समाजाने मूळ मुद्दा वाचवून ठेवावा. आपले लक्ष आरक्षण आहे. त्यामुळे वाचाळवीर हाके वर सगळ्यांनी बोलू नये, त्याकरिता सगळ्यांनी एकजूट टिकवावी; ठोस अकरा सदस्यांची टीम तयार करावी, तेच फक्त हाकेला बोलतील, नाही ऐकले तर रस्त्यावर फटकावून काढू, अशी टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावर त्यांनी केली. तसेच सुनील कोटकर यांनीही लक्ष्मण हाके जिथे भेटतील तिथे फटकावून काढणार, असा इशारा दिला,
मराठ्यांना दिलेले एसईबीसी आरक्षण ओबीसीप्रमाणे सर्व सवलतींसह टिकवावे. तसेच न्यायालयीन लढ्यासाठी अभ्यासकांची बैठक घेऊन, समाजाला कायमस्वरूपी आरक्षण देण्यासाठी सरकारकडून ठोस उपाययोजना व्हाव्यात. सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, राजश्री शाहू परिपूर्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता आदी योजनांमधील अनुदान वाढवून वेळेवर द्यावे व लाभार्थीच्या खात्यात दर महिन्याला नियत वेळेत जमा करावे, आरक्षणासाठी गठित करण्यात आलेल्या मराठा आणि ओबीसी समाजाच्या दोन्ही समित्या रद्द करण्यात याव्यात.
मंत्रिमंडळातील एखादा मंत्री सरकारच्या विरोधात बोलत असेल, तर तो सरकारविरोधी समजला जातो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री छगन भुजबळ यांचा राजीनामा मागावा; नाही तर आम्ही समजू भुजबळ यांना मुख्यमंत्री बोलायला लावत आहेत.