Goodbye 2025, welcome 2026... The new year was welcomed with great celebration in the city.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा दिव्यांचा झगमगाट अन् डीजेच्या तालावर बेधुंद थिरकत... फटाक्यांच्या आतषबाजीत... झपाटलेल्या वातावरणात बुधवारी (दि.३१) मध्यरात्री शहरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप देतानाच नववर्षाच्या स्वागताचा उत्साह पाहावयास मिळाला. शहराच्या विविध भागांत हॉटेल्स, रेस्टॉरंट गर्दीने फुलून गेले होते. रात्री १२ वाजेचा ठोका पडताच सर्वांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेक ठिकाणी पहाटेपर्यंत जल्लोष सुरू होता. यंदा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्साहाला अधिकच उधाण आल्याचे दिसून आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही थर्टीफर्स्टनिमित्त
बुधवारी सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे जंगी स्वागत करण्यासाठी शहरवासीय आतुरलेले असल्याने शहराच्या विविध भागांतील हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जय्यत तयारी करण्यात आ-लेली होती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकत्यांच्या मेजवानीसाठी विशेष सोय केली होती. यासह ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विद्युत रोषणाईचा झगमगाट, विशेष सजावट आणि खास प्रकारच्या मेनूसह वेगवेगळ्या ऑफर्सचे आयोजन केले होते.
नववर्षाच्या स्वागतासाठी सायंकाळपासूनच हॉटेल्स, रेस्टॉरंट, हुरडा पार्टी स्पॉट गर्दीने फुलून गेलेले दिसले. कुटुंब, मित्रकंपनीसह अनेकांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. कॉलेज कट्टा, क्लासेसच्या ठिकाणासह रस्त्या रस्त्यांवर तरुणाईचा सायंकाळपासून जल्लोष सुरू होता. निराला बाजार, कॅनॉट मार्केट, गारखेडासह विविध भागांत आनंद साजरा करण्यासाठी गर्दी जमली. रात्री १२ वाजेचा ठोका पडताच फटाक्यांच्या आतषबाजीत सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत नववर्षाचे स्वागत केले.
हॉटेल, पंचतारांकितमध्ये नववर्षाचे स्वागत
शहरातील पंचतारांकित हॉटेल्समध्येही विशेष नियोजन करण्यात आले होते. कुटुंबासह नागरिकांना खास आकर्षित करण्यासाठी लायटिंगसह आकर्षक सजावट करण्यात आली होती. सांयकाळपासूनच अनेकांनी संगीताच्या सप्तसुरांसोबत थंडपेय आणि विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत रात्री १२ वाजता नववर्षाचे स्वागत केले.
घरोघरी नववर्षाचा आनंदोत्सव
नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील अनेक सोसायट्या, कॉलनीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डीजेच्या तालावर आबालवृध्दांनी एकच जल्लोष केला, तर अनेकांनी घरातच कुटुंबांसह नवीन वर्षाचे मोठ्या आनंदात स्वागत केले.