ST Corporation : एसटीच्या प्रोत्साहन भत्ता योजनेला चांगला प्रतिसाद  Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

ST Corporation : एसटीच्या प्रोत्साहन भत्ता योजनेला चांगला प्रतिसाद

हजारावर चालक, वाहकांना मिळाला लाभ

पुढारी वृत्तसेवा

Good response to ST's incentive allowance scheme

छत्रपती संभाजीनगर : जे. ई. देशकर एसटी महामंडळाने उत्पन्न वाढवण्यासाठी जानेवारी-२०२५ मध्ये प्रोत्साहन भत्ता योजना राबवली. याला छत्रपती संभाजीनगर विभागातून चांगला प्रतिसाद मिळाला असून, या योजनेअंतर्गत १९ हजार २६३ कर्तव्ये पार पडली. त्यापैकी ६७३ कर्तव्यांना (क्रू) प्रोत्साहन भत्त्याचा लाभ मिळाला असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांनी दिली.

वर्दळ कमी असल्यानंतर तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन भत्ता ही योजना वेळोवेळी राबवण्यात येते. ही योजना छत्रपती संभाजीनगर विभागात जानेवारी महिन्यात राबवण्यात आली. या महिन्यात १९ हजार २६३ कर्तव्ये पार पडली. त्यापैकी ६७३ कर्तव्यांमध्ये प्रोत्साहन भत्ता पात्रता निकष पूर्ण झाले. या कर्तव्यांमध्ये कार्यरत असलेल्या चालक आणि वाहकांना प्रोत्साहन म्हणून १ लाख ७८ हजार ७५ रुपयांचा भत्ता देण्यात आला आहे.

या योजनेत ५७५ चालक आणि ५७१ वाहक यांचा समावेश झाला होता. चालकांना ८९ हजार ३८ रुपये, तर वाहकांना ८९ हजार ३७ रुपये इतका प्रोत्साहन भत्ता वाटप करण्यात आला. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान या महिन्याभरात या सर्वांनी वरिष्ठ कार्यालयाने उत्पन्नाचे दिलेले टार्गेट पूर्ण केले.

प्रवाशांची संख्या कमी होत असताना एसटी महामंडळाने प्रवासी वाढवण्यासाठी कर्मचारीवर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना व राबवली. त्यामुळे चालक-वाहक वगनि अधिक प्रवाशांना बसकडे आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. ही योजना महसूल वाढीसाठी मैलाचा दगड ठरत आहे. ही योजना विविध विभागात राबवली जाते.

महामंडळाने या योजनेचा आढावा घेत पुढील महिन्यात अधिक कर्तव्यांचा समावेश व्हावा यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे संकेत दिले आहेत. कर्मचारीवर्गाचा सहभाग यापुढेही वाढत राहिला, तर एसटी महामंडळाच्या आर्थिक पुनरुज्जीवनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

एसटी महामंडळातर्फे भत्ता दिला जातो, जो वाढीव उत्पन्नावर आधारित असतो. या योजनेंतर्गत, चालक वाहक उद्दिष्ट्यापेक्षा अतिरिक्त उत्पन्न आणल्यास त्यापैकी २०% रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून मिळवू शकतात. हा भत्ता कर्मचाऱ्यांना अधिक मेहनत करण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी प्रेरित करते, असा दावा एसटीतील एका अधिकाऱ्याने केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT