Sambhajinagar News : संभाजीनगरात प्रथमच उभारणार गोल्फ, पोलो, रेसिंग मैदान file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : संभाजीनगरात प्रथमच उभारणार गोल्फ, पोलो, रेसिंग मैदान

बिडकीनजवळ उभी राहणार १,२३५ कोटींची आलिशान टाउनशिप

पुढारी वृत्तसेवा

Golf, polo, and racing grounds to be set up in Sambhajinagar for the first time

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बिडकीन औद्योगिक क्षेत्राजवळ आता आलिशान टाउनशिप उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. डेला टाउनशिप्स इंडिया कंपनीकडून १०४ एकर क्षेत्रावर तब्बल १ हजार २३५ कोटी रुपये गुंतवणुकीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहे. यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फ कोर्स, मोटर रेसिंग सर्किट आणि पोलो क्लब यांसारख्या सुविधांचा समावेश असणार आहे.

विशेष म्हणजे, शहरातील पहिला पोलो क्लब सुरू करण्याचे नियोजन आहे. फेडरेशन इंटरनॅशनल डी ल' ऑटोमोबाइल (एफआयए) मानांकनाचे १८ होलचे रेसिंग सर्किट, आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोल्फ कोर्स आणि आंतरराष्ट्रीय पोलो क्लब अशा आकर्षक सुविधांमुळे हा प्रकल्प चर्चेत आला आहे. या माध्यमातून शहरवासीयांना पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पोलो खेळाचा अनुभव घेता येणार आहे.

या प्रकल्पाचा एकूण खर्च (जीडीव्ही) १ हजार २३५ कोटी रुपये असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बिडकीन परिसरात प्रस्तावित असलेल्या तीन टाउनशिप प्रकल्पांपैकी डेला कंपनीचा हा प्रकल्प एक आहे. औद्योगिक गुंतवणूक, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि एकात्मिक निवासी संकुलांची वाढती मागणी यामुळे या परिसरात खासगी विकासकांचा रस वाढत असल्याचे स्थानिक विकासकांचे म्हणणे आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा

बिडकीन औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असल्याने या परिसरात आलिशान निवासी आणि व्यावसायिक सुविधांची मागणी वाढत आहे. टोयोटा, जेएसडब्ल्यू आणि इतर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे या भागात औद्योगिक विकासाला वेग आला आहे. तसेच जपान आणि दक्षिण कोरियातील अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निवास आणि जीवनशैलीविषयक सुविधांची मागणीही वाढणार आहे

अद्याप अंतिम निर्णय नाही

या प्रकल्पाच्या जमिनीबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. कंपनीने बिडकीन औद्योगिक क्षेत्रातील संबंधित प्राधिकरणाकडे अद्याप प्रस्ताव सादर केलेला नाही. असे डेला टाउनशिप्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT