Gold jewelry stolen after breaking down the door
हतनूर, पुढारी वृत्तसेवा कन्नड तालुक्यातील टापरगाव येथे शनिवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करीत कपाटातील १ लाख ६५ हजारांचे सोन्याचे दागिने, १० हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत दत्तू बापूराव मोहिते यांनी फिर्याद दिली आहे.
दत्तू मोहिते यांचे टापरगांव येथे दोन मजली राहते घर आहे. शनिवारी संध्याकाळी पत्नी चित्रा व दत्तू मोहिते ८ वाजता जेवण झाल्यानंतर रात्री १० वाजता वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. रविवारी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान घरातील लाकडी कपाटाचा दरवाजा तोडून त्यात असलेले सून लता मोहिते यांचे २० ग्रॅम चे सोन्याची पोत, १० ग्रॅम नॅकलस, पत्नी चित्रा मोहिते यांची १५ ग्रॅम सोन्याची पोत, ३० ग्रॅम कानातील झुंबके व १० हजार रोख असे एकूण १ लाख ७५ हजार चा ऐवज अ चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले.
कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कैलास करवंदे, शिवदास बोरडे पोलीस कर्मचारी करीत आहेत.